"जयंत पाटलांनी मला स्पष्टच सांगितलंय"; आता जितेंद्र आव्हाडांकडून शरद पवारांचा संदर्भ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 08:33 AM2023-08-07T08:33:40+5:302023-08-07T08:42:58+5:30
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि शरद पवारांचे विश्वासू सहकारी असलेले जयंत पाटील अजित पवारांच्या गटात जाणार असल्याच्या ...
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि शरद पवारांचे विश्वासू सहकारी असलेले जयंत पाटील अजित पवारांच्या गटात जाणार असल्याच्या चर्चांनी सध्या जोर धरला आहे. गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर आले असता जयंत पाटलांनी त्यांची भेट घेतल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. त्यावर, स्वत: जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण देत चर्चेला पूर्णविराम दिलाय. आता, या चर्चेवर राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच, शरद पवारांनी जयंत पाटलांना काय सांगितलंय, हेही त्यांनी मला सांगितल्याचं आव्हाड यांनी म्हटलं आहे.
''मी आता या चर्चांवर रोज सकाळी येऊन स्पष्टीकरण देणार नाही. रोज नव्या बातम्या समोर येत आहेत, राज्यात रोज गैरसमज पसरवले जात आहेत. मी रात्री अनिल देशमुख, राजेश टोपे,सुनिल भुसारा आम्ही रात्री दीड वाजेपर्यंत एकत्र होतो. आज सकाळी मी शरद पवार साहेबांची भेट घेतली. या भेटीत आम्ही पक्षवाढीवर चर्चा केली. माझ्याविषयी लोकांच्या गैरसमज पसरवला जात आहे,'' असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलं. त्यानंतर, आता जितेंद्र आव्हाड यांनीही जयंत पाटील कुठेही जाणार नाहीत, यासंदर्भात आम्हा दोघांची चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलं.
राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष जयंतजी पाटील यांच्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही जणांकडून केला जात आहे. जाणून बुजून ते कोणाला तरी भेटून आले, ते मंत्री होणार, त्यांनी गावातून लोकं बोलावली, अशा प्रकारच्या बातम्या पेरण्यात येत आहेत. ही पेरणी कशासाठी केली जातेय, हे आम्हांला बरोबर समजतंय. जयंत पाटील यांच्यासोबत माझं वैयक्तिक बोलण झालं. पण त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं की," जितेंद्र, साहेबांनी ईशारा दिलेला आहे लढायचंय. आता थांबणे नाही.", असे आव्हाड यांनी म्हटले. आव्हाड यांनी शरद पवार यांचा संदर्भ देत जयंत पाटील कुठेही जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
''मला वाटत नाही की, प्रत्येक नेत्याने दररोज येऊन सांगावं की, आम्ही लढणार आहोत, आम्ही लढणार आहोत. आम्ही मागेच सांगितल आहे की, आम्ही पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून लढणार आहोत. त्या भूमिकेत काहीच फरक पडणार नाही. तेव्हा कृपया ह्या अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. आमचं ठरलंय, आम्ही लढणार म्हणजे लढणारच. लोकशाहीचं पवित्र मंदिर वाचवणे ही काळाची गरज आहे. आणि ते जर आम्ही केलं नाही तर, पुढची पिढी आम्हांला कधीच माफ करणार नाही. सत्ता येते-जाते, पण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानातून निर्माण झालेली संसदीय लोकशाही वाचली नाही, तर पुढची पिढी आम्हांला कधीच क्षमा करणार नाही, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी जयंत पाटील यांच्याबाबतच्या चर्चेवर आपल मत मांडलं आहे.
राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष श्री.जयंतजी पाटील साहेब यांच्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही जणांकडून केला जात आहे.जाणून बुजून ते कोणाला तरी भेटून आले,ते मंत्री होणार,त्यांनी गावातून लोक बोलावली,अशा प्रकारच्या बातम्या पेरण्यात येत आहेत.ही पेरणी कशासाठी केली जातेय,हे… pic.twitter.com/1wVpMBG2LZ
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 6, 2023