जयंत पाटलांचा खास NCP आमदार अजित पवारांच्या गळाला?; देवगिरी बंगल्यावर घेतली भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 11:07 AM2023-07-04T11:07:15+5:302023-07-04T11:07:56+5:30
अजित पवारांनी दिलेल्या या धक्कातंत्रामुळे राष्ट्रवादीत फूट पडल्याचे समोर आले.
मुंबई – अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याचे दिसून येते. राष्ट्रवादीचे बहुसंख्य आमदार आपल्या पाठिशी आहेत असा दावा अजित पवारांकडून केला जात आहे. तर ९ आमदार वगळता बाकीचे शरद पवारांच्या सोबत असल्याचे राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. त्यात दोन्ही गटाकडून येत्या ५ जुलैला मुंबईत बैठकीचे आयोजन केले आहे. त्यामुळे नेमके कुणाकडे किती आमदार हे त्यावेळी समोर येण्याची शक्यता आहे.
तत्पूर्वी शरद पवार समर्थक आमदार आणि जयंत पाटील यांचे भाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी देवगिरी बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. प्राजक्त तनपुरे हे शरद पवारांसोबत असल्याचे कालपर्यंत सांगण्यात येत होते. परंतु आज सकाळी तनपुरे यांनी अजितदादांची भेट घेतल्याने आता प्राजक्त तनपुरे अजित पवारांच्या गळाला लागलेत का असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. इंदापूरचे आमदार दत्ता भरणे हेदेखील देवगिरी बंगल्यावर अजितदादांच्या भेटीला आले होते. आज सकाळपासून अनेकजण अजित पवारांची भेट घेत आहेत.
गेल्या ३ दिवसांपासून राष्ट्रवादीत प्रचंड वेगाने घडामोडी घडत आहे. रविवारी अजित पवारांसह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ यांच्यासारख्या दिग्गजांनी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांनी दिलेल्या या धक्कातंत्रामुळे राष्ट्रवादीत फूट पडल्याचे समोर आले. त्यानंतर तातडीने पक्षाकडून जितेंद्र आव्हाड यांची प्रतोदपदी नेमणूक करण्यात आली. रात्री उशीरा आव्हाडांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या घरी जाऊन ९ आमदारांना अपात्र करण्यात यावे असे पत्र दिले. राष्ट्रवादीचे ४० पेक्षा जास्त आमदार अजित पवारांच्या पाठिशी असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु अद्याप दोन्ही बाजूने आकडा स्पष्ट करण्यात आला नाही.
राष्ट्रवादीतील या घडामोडीत अजित पवारांनी पक्षाचे चिन्ह आणि नावावर दावा केला आहे. त्यानंतर प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्याचसोबत पक्षातील इतर नेमणुका करण्यात आल्या. अजित पवार गटाकडून जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना अपात्र करावे असे पत्र विधानसभा अध्यक्षांना देण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.