कंगनाच्या वक्तव्यावर राज्यभर संताप, बॉलीवूडसह राजकारणही ढवळले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 06:50 AM2020-09-05T06:50:15+5:302020-09-05T06:51:02+5:30
सुशांतसिंह मृत्यू प्रकरण, ड्रग्ज आणि बॉलीवूड माफियांवरून अभिनेत्री कंगना रनौत आणि शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्यातील कलगीतुरा शुक्रवारी सर्वपक्षीय बनला.
मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत हिने मुंबईसह महाराष्ट्रासंदर्भात केलेल्या टिवटिवाटानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली असून जागोजागी तिच्या पोस्टरचे दहन करण्यात आले. कंगनाच्या वक्तव्यावर शिवसेना, मनसेसह सर्व पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे, तर भाजपने यातून अंग काढून घेतले. बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी देखील तिच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत तिला खडे बोल सुनावले.
सुशांतसिंह मृत्यू प्रकरण, ड्रग्ज आणि बॉलीवूड माफियांवरून अभिनेत्री कंगना रनौत आणि शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्यातील कलगीतुरा शुक्रवारी सर्वपक्षीय बनला. कंगनाने मुंबईला पाकव्याप्त काश्मीर संबोधून मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान केल्याचे सांगत शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला. शिवसैनिकांनी मुंबईसह राज्यातील विविध भागांत कंगनाचे पोस्टर जाळले, निदर्शने केली. यावर, तुमच्या प्रमाणपत्राची मला गरज नाही. जीव आणि करिअर पणाला लावून मराठा अस्मितेचा गौरव करणारे चित्रपट केले आहेत, तुम्ही ठेकेदारांनी काय केले, असा सवाल कंगनाने केला.
कंगनाने टिष्ट्वट करून काही बोलावे आणि त्याला प्रतिउत्तर म्हणून शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांच्या टोलेबाजीचे सत्र दिवसभर चालू होते. भाजपच कंगनाचा बोलविता धनी असल्याचा आरोप आघाडीने केला. तर, कंगनाच्या विधानांशी सहमत नसल्याचे सांगत तिच्या आडून वार करू नका, असा इशारा भाजपने दिला. सोशल मीडियातही दिवसभर याच विषयावरून घमासान सुरू होते. दरम्यान, मनसेचे चित्रपट सेना आणि करणी सेनेने कंगनाला खडे बोल सुनावले असून महाराष्टÑाचा अपमान केल्यास मुंबईत शुटिंग करू देणार नाही, असा इशारा दिला. तर केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कंगनाची पाठराखण करत तिला रिपाइं संरक्षण देईल, असे म्हटले आहे.
भाजपने राखले अंतर
कंगना रनौत हिने मुंबई, महाराष्टाबाबत केलेल्या वक्तव्याशी भाजपला जोडणे दुर्दैवी आहे. भाजप त्याच्याशी असहमत आहे. कंगनाने महाराष्ट्राला शिकवू नये! कंगनाच्या आडून कुणी भाजपवर वार करण्याचा प्रयत्नही करू नये, असे सांगत भाजप नेते आशिष शेलार यांनी कंगनापासून अंतर राखण्याचा प्रयत्न केला.
कंगनाची टिष्ट्वटरवर फटाक्यांची माळ
संजय राऊत यांनी मुंबईत येऊ नका, अशी धमकी दिल्याचा आरोप कंगनाने गुरुवारी केला होता. हा वाद शमतो ना शमतो तोच कंगनाने शुक्रवारी शिवसेनेला थेट आव्हान देणारे टिष्ट्वट केले. ‘बरेच जण मला मुंबईला परत न येण्याची धमकी देत आहेत, म्हणून मी आता ९ सप्टेंबरला मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई विमानतळावर उतरल्याची वेळही टिष्ट्वटरवर पोस्ट करेन. कोणाच्या बापात हिंमत असेल तर अडवा,’ असे आव्हानच दिले आहे.
‘जे चापलूस आज महाराष्ट्राबद्दलचे प्रेम दाखवतायत त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी. हिंदी चित्रपटांच्या इतिहासात मी पहिली अभिनेत्री आणि निर्माती आहे जिने मराठा अस्मिता, शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबार्इंवर चित्रपट बनविला. त्याच्या प्रदर्शनासाठी मला याच लोकांचा विरोध सहन करावा लागला.’
‘महाराष्ट्र कोणाच्या बापाचा नाही. महाराष्ट्र त्याचाच आहे ज्याने मराठी गौरवाला प्रतिष्ठित केले. आणि मी टिच्चून सांगतेय, मी मराठा आहे. काय उखडायचे आहे ते उखडा.’
‘एका महान पित्याच्या पोटी जन्म घेतलेत इतकीच तुमची ओळख असू शकत नाही. मला महाराष्ट्र प्रेम अथवा द्वेषाचे प्रमाणपत्र देणारे तुम्ही कोण? कशावरून ठरवलेत की महाराष्ट्रावर तुमचे प्रेम जास्त आहे आणि आता मला तिथे यायचा अधिकार नाही.’
त्यांना मुंबईत राहण्याचा अधिकार नाही - गृहमंत्री
कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलीस दल सक्षम आहे. त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांचा मी तीव्र निषेध करतो. ज्यांना मुंबईत राहणं सुरक्षित वाटत नाही, त्यांना मुंबई वा महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत गृहमंत्र्यांनी कंगनाचा समाचार घेतला.
जे भाजपच्या पोटात ते कंगनाच्या मुखात - थोरात
जे भाजपच्या पोटात आहे तेच गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कंगनाच्या मुखातून आणि टिष्ट्वटमधून बाहेर येत आहे. कंगनाला पुढे करून मुंबई पोलीस, मराठी माणूस आणि महाराष्ट्राचा अपमान करणाºया द्रोह्यांना जनता कधीच माफ करणार नाही, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली.
पोकळ धमक्या देत नाही, मी अॅक्शनवाला माणूस - राऊत
मी पोकळ धमक्या देत नाही, मी शिवसैनिक आहे. अॅॅक्शनवाला माणूस आहे. ही मुंबई १०६ हुतात्म्यांनी मिळवली आहे. मुंबईचे रक्षण आमच्या पोलिसांनी केले आहे. मुंबई पोलिसांबद्दल कुणीही ऐरे-गैरे काहीही बोलत असतील, तर त्यांच्यावर राज्य सरकारने कारवाई करावी.
- संजय राऊत, खासदार, शिवसेना