करारा जवाब मिलेगा...! ईडीच्या कारवाईनंतर अमोल कोल्हेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 12:57 PM2019-09-25T12:57:13+5:302019-09-25T12:57:18+5:30
राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक चिडले असून सरकारचा निषेध करण्यात येत आहे.
मुंबई - राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्याच्या आरोपाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांच्यासह 70 जणांवर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. पवारांवरील केलेली कारवाई राजकीय सुडबुद्धीने केल्याचा आरोप पवार समर्थकांनी केला आहे. शरद पवारांच्या समर्थनार्थ बारामती बंदची हाक कार्यकर्त्यांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे नेतेही भाजपा सरकारवर तुटून पडले आहेत. राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही ट्विटरच्या माध्यमातून या कारवाईवर भाष्य केले आहे.
राज्य सहकारी बँकेच्या कर्जवाटपात तब्बल 25 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा अहवाल नाबार्डने दिल्यावर सुरेंद्र अरोरा यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर 26 ऑगस्ट रोजी अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता त्यात शरद पवार यांचाही समावेश झाल्याचे समजते. त्यानंतर राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक चिडले असून सरकारचा निषेध करण्यात येत आहे. सरकारकडून ही कारवाई सूडबुद्धीने होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते करत आहेत. त्यात, आता शिवस्वराज्य यात्रेचं नेतृत्व करणारे डॉ. अमोल कोल्हे यांनीही सरकारला लक्ष्य केलं आहे.
ED चा कुटील डाव न समजायला माणसं काही
येडी नाहीत ! मिलेगा...करारा जवाब मिलेगा !!
असे ट्विट अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे कोल्हे यांनी आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेंशन केलं आहे.
शरद पवार कर्ज घोटाळ्याचे सूत्रधार?
मध्यवर्ती शिखर बॅँकेच्या संचालक मंडळात शरद पवार नसले तरी त्यांच्या नेतृत्वाखाली बॅँकेचा कारभार सुरू होता, असा आक्षेप याचिकाकर्त्याने घेतला आहे. त्यामुळे त्यांचा मुख्य सूत्रधारांमध्ये समावेश करण्यात आला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. आवश्यकतेनुसार याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांच्याविरुद्ध नोटीस बजावून चौकशीला बोलावण्यात येईल, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
EDचा कुटील डाव न समजायला माणसं काही
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) September 25, 2019
येडी नाहीत! मिलेगा...करारा जवाब मिलेगा!! @Dev_Fadnavis@bbcnewsmarathi@News18lokmat@abpmajhatv@TV9Marathi@supriya_sule@NCPspeaks@Jayant_R_Patil@PawarSpeaks@Awhadspeakspic.twitter.com/4eoVc4NxGl