Kerala Floods : औषधे म्हणजे मिठाई नाही, हायकोर्टाने फटकारले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2018 08:12 AM2018-09-01T08:12:25+5:302018-09-01T11:27:51+5:30
Kerala floods : केरळ पूरग्रस्तांसाठी फार्मास्युटिकल कंपनीला दीड कोटी जमा करण्याचा आदेश
मुंबई : ज्या फार्मा कंपन्या ग्राहकांच्या आरोग्यासाठी औषधे पुरवितात, त्यांना ग्राहकांची काळजी घेणे, हे विशेष कर्तव्य आहे. अलीकडे नफा कमाविण्यासाठी लोकांचे आरोग्य दावणीला बांधण्यात येते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. तसेच फार्मास्युटिकल कंपनीला ट्रेडमार्क कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिक्षा म्हणून केरळ पूरग्रस्तांसाठी केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या साहाय्यता निधीमध्ये दीड कोटी रुपये जमा करण्याचा आदेश शुक्रवारी दिला.
अन्य फार्मा कंपन्यांनी ट्रेडमार्क रजिस्टर केलेल्या औषधांची नक्कल करण्याची सवय गाल्फ लॅबोरिटीजला आहे, असे निरीक्षण न्या. एस. जे. काथावाला यांनी ग्लेन्मार्कने गाल्फ लॅबोरिटीजविरुद्ध केलेल्या दाव्याच्या सुनावणीत नोंदविले. ग्लेन्मार्कच्या म्हणण्यानुसार, प्रतिवादी कंपनी ‘कोल्डीड-बी’ नावाचे क्रीम विकत आहे. ते ग्लेन्मार्कच्या ‘कॅण्डीड बी’ क्रीमशी मिळतेजुळते आहे. प्रतिवादी कंपनीने ‘कॅण्डीड बी’च्या डिझाईन, पॅटर्नप्रमाणेच त्यांच्या क्रीमचे पॅटर्न, डिझाईन केले आहे. न्यायालयाने ग्लेन्मार्कचा युक्तिवाद स्वीकारत म्हटले, औषधे म्हणजे मिठाई नाही. लोकांच्या आरोग्याशी खेळून नफा कसा कमवावा, याचे योग्य उदाहरण म्हणजे हा दावा आहे.
विनंतीची दखल
न्यायालयाने ग्लेन्मार्कला गाल्फ लॅबला पैसे देण्यास सांगितले. मात्र, त्यांनी एनजीओत रक्कम जमा करण्याची विनंती केली. त्यानुसार न्यायालयाने त्यांना केरळ पूूरग्रस्तांना दीड कोटींचा निधी देण्याचा आदेश दिला.