Kerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2018 09:41 PM2018-08-19T21:41:23+5:302018-08-19T21:43:17+5:30
Kerala Floods ; केरळमधील महापुराच्या मदतीसाठी भारतीय नौदल सक्षमतेने समोर आले आहे. ‘ऑपरेशन मदद’ लॉन्च करीत नौदलाने तेथे स्वयंपाक तयार करण्यासह, जेवणाची पाकिटे पुरविणे, रुग्णांवर उपचार करणे, अडकलेल्यांची सुटका करणे
चिन्मय काळे
मुंबई : केरळमधील महापुराच्या मदतीसाठी भारतीय नौदल सक्षमतेने समोर आले आहे. ‘ऑपरेशन मदद’ लॉन्च करीत नौदलाने तेथे स्वयंपाक तयार करण्यासह, जेवणाची पाकिटे पुरविणे, रुग्णांवर उपचार करणे, अडकलेल्यांची सुटका करणे अशी बहुआयामी बचावकार्ये सुरू केली आहेत. या मोहिमेसाठी मुंबईहून आयएनएस दीपक हे विशेष जहाजही कोचिनला पोहोचले आहे.
कोचिनला नौदलाचे दक्षिण नाविक कमान आहे. मुंबईला पश्चिम नाविक कमान आहे. दक्षिणेच्या मदतीसाठी मुंबईच्या पश्चिम कमाने विशेष जहाज तातडीने रवाना केले आहे. ८ लाख लिटर पाणी, १३ हजार ५९२ किलो खाद्यान्न, ४८८ किलो धान्य, १२२८ किलो जेवणाची पाकिटे, ३४०० पाण्याच्या बाटल्या व ३१०० पाणी पाऊच घेऊन आयएनएस दीपक कोचिनला पोहोचले आहे. नौदलाने प्रामुख्याने एर्नाकुलम (कोचिनसह), थ्रिसूर, अलफुझा व पठानमहित्ता या चार जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. या चार जिल्ह्यांसाठी ४८ बचाव टीम्स तैनात करण्यात आल्या असून त्यांनी आतापर्यंत १४ हजार ७९७ नागरिकांची पाण्याच्या गराड्यातून सुटका केली आहे.
याखेरीज कोचिन येथील नाविक तळावतील नौदलाच्या शाळा, नौदल वसाहत, नौदलाकडून चालविल्या जाणाऱ्या दोन केंद्रीय विद्यालय या सर्व सध्या पुरग्रस्त नागरिकांसाठी हक्काचे ठिकाण बनले आहे. नौदला कर्मचारी व कुटुंबिय नागरिकांची सेवा करीत आहेत.
‘आयएनएस गरूड’ मोहिमेचे प्रमुख केंद्र
कोचिन नाविक तळाजवळ असलेला ‘आयएनएस गरूड’ हा हवाईतळ आता नौदलाच्या ‘आॅपरेशन मदद’ या बचाव मोहिमेचे प्रमुख केंद्र झाले आहे. संपूर्ण बचावकार्याचे नियोजन येथूनच सुरू आहे. ध्रृव (एएलएच), सी किंग, चेतक, हवाईदलाचे एमआय १७ यासारख्या हेलिकॉप्टर्सच्या नागरिकांच्या बचावासाठी आयएनएस गरूडवरुन असंख्य फेऱ्या केल्या जात आहेत.
प्रशिक्षणार्थी नाविकही बचावकार्यात
कोचिन येथे नौदलातील नाविकांची प्रशिक्षण संस्था आहे. या संस्थेतील प्रशिक्षणार्थीनीही बचावकार्यात उडी घेतली आहे. सर्वात आधी या नाविकांनी आयएनएस गरूड या हवाईतळाची धावपट्टी अहोरात्र मेहनत करुन मोकळी केली. २० आॅगस्टपासून या धावपट्टीवरुन व्यावसायिक विमानांचे उड्डाण सुरू केले जाणार आहे. मुख्य म्हणजे या विमानांच्या सुरक्षित उड्डाणासाठी आवश्यक असलेली सर्व कामे हे प्रशिक्षणार्थी नाविकच करीत आहेत.
इस्पितळाला पोहोचविली वीज
कोचिनमधील अमृता वैद्यकीय संस्थेत १ हजार रुग्ण दाखल होते. पुरामुळे या इस्पितळाची वीज गेली होती. त्यासाठी नौदल जहाज दुरूस्ती केंद्रातील अधिकारी व नाविकांनी कंबरेभर पाण्यात सलग दहा तास काम करुन वीज पुरवठा पूर्ववत केला. आयसीयुतील रुग्णांचे यामुळे प्राण वाचले.
आयएनएस वेंदुरुथीकडून अहोरात्र जेवण
कोचिन तळाजवळीलच आयएनएस वेंदुरुथी या नौदलाच्या प्रशासकीय तळामार्फत अहोरात्र जेवणाची सोय करण्यात आली आहे. नौदलातील १७ स्वयंपाकी, ४ अधिकारी व १३ कर्मचारी ५ हजार पूरग्रस्तांसाठी दिवसरात्र जेवण तयार करीत आहेत.