काँग्रेसच्या जनसंपर्क अभियानातही खरखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 02:24 AM2018-11-25T02:24:52+5:302018-11-25T02:25:01+5:30

पुणे : अखिल भारतीय काँग्रेस महासमितीने दिलेल्या जनसंपर्क अभियानाच्या आयोजनासाठी शहर काँग्रेस घेत असलेल्या विधानसभा मतदारसंघनिहाय बैठकांमध्येही आता नेत्यांचे ...

Kharak in public relations campaign of Congress | काँग्रेसच्या जनसंपर्क अभियानातही खरखर

काँग्रेसच्या जनसंपर्क अभियानातही खरखर

Next

पुणे : अखिल भारतीय काँग्रेस महासमितीने दिलेल्या जनसंपर्क अभियानाच्या आयोजनासाठी शहर काँग्रेस घेत असलेल्या विधानसभा मतदारसंघनिहाय बैठकांमध्येही आता नेत्यांचे वागणे, कार्यकर्त्यांची संख्या, सहभाग, यावरून खरखर सुरू आहे. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत याच मुद्द्यांवरून शहराध्यक्षांनी नेत्यांना कानपिचक्या दिल्या असल्याची चर्चा आहे. काही जणांनी तर थेट पदाधिकाऱ्यांनाच ‘तुम्ही शहरात गंभीरपणे लक्ष दिले पाहिजे’ असे सांगितले.


पक्षाध्यक्ष राहूल गांधी यांनी हा जनसंपर्क अभियानाचा कार्यक्रम पक्षाच्या जिल्हा, शहर शाखांना दिला असून, पक्षाचे ध्येयधोरण थेट मतदारांपर्यंत जाऊन त्यांना समजावून सांगणे हा त्यातील प्रमुख भाग आहे. त्याच्या नियोजनासाठी म्हणून शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका सुरू केल्या आहेत. कसबा मतदारसंघाची बैठक बुधवारी झाली, शुक्रवारी दुपारी गोखलेनगर येथे एका सभागृहात शिवाजीनगर मतदारसंघाची बैठक झाली. नेते वगळता बैठकीला कार्यकर्त्यांची संख्या एकदमच कमी असल्याने सुरुवातीपासूनच शहराध्यक्ष बागवे यांनी बैठकीत नाराजीचा सूर लावला.


शहर शाखेने प्रदेश शाखेला लोकसभा निवडणुकीसाठीचे पुण्यातील इच्छुक म्हणून आमदार अनंत गाडगीळ, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड, महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे यांची नावे सुचवली आहेत. ते सगळेच बैठकीला उपस्थित होते.


त्याशिवाय माजी आमदार दीप्ती चवधरी, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, माजी नगरसेवक गोपाळ तिवारी, दत्ता बहिरट, सुलभा भोंडवे तसेच पक्षाचे शिवाजीनगरमधील अन्य काही जुने कार्यकर्ते, माजी पदाधिकारी बैठकीला आले होते.

किमान १० कार्यकर्ते आणले असते तर...
प्रत्येक नेत्याने किमान १० कार्यकर्ते आणले असते तरी बैठकीला १०० पेक्षा जास्त उपस्थिती असली असती. कार्यकर्तेच येत नसतील तर मग पक्षाचे कार्यक्रम राबवायचे कसे असा प्रश्न त्यांनी केला.
पक्षाने आतापर्यंत कित्येकांना बरेच काही दिले. आता पक्षाला काही द्यायची वेळ आलेली असताना मागेपुढे पाहिले जात असेल तर ते योग्य नाही. पक्षाचे कार्यक्रम कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पुढे जात असतात, तेच होत नसेल तर नेत्यांनी कितीही भाषणे केली तरी काहीही होत नाही असे बागवे यांनी बजावले.
छाजेड, शिवरकर, गाडगीळ, शिंदे, जोशी यांची या वेळी भाषणे झाली. काहींनी सूचना करताना पदाची जबाबदारी घेतली असेल, तर मग शहरात गंभीरपणे लक्ष घातले पाहिजे, असे सांगितले.
बागवे यांनी पक्षाने जनसंपर्क अभियानासाठी दिलेल्या कार्यक्रमांची माहिती दिली व त्याप्रमाणे नियोजन करावे, त्याचा अहवाल द्यावा, काही मदत हवी असल्यास तसे सांगावे असे, आवाहन केले.

Web Title: Kharak in public relations campaign of Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.