खारघर प्रकरणाच्या चौकशीसाठी एक सदस्यीय सरकारी समिती म्हणजे निव्वळ धुळफेक, काँग्रेसची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 04:01 PM2023-04-21T16:01:15+5:302023-04-21T16:02:30+5:30
Kharghar heatstroke tragedy: खारघर घटनेची चौकशी करण्यासाठी सरकारने महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली एक सदस्यीय समिती ही केवळ धुळफेक आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे.
मुंबई - महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रमात १४ लोकांचा मृत्यू हे शिंदे-फडणवीसांच्या निर्लज्ज सरकारचे बळी आहेत. सरकार आजही या प्रकरणावर मूग गिळून गप्प आहे. खारघर घटनेची चौकशी करण्यासाठी सरकारने महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली एक सदस्यीय समिती ही केवळ धुळफेक आहे. सरकारच सरकारची चौकशी करत असेल तर ती निष्पक्ष कशी असेल? म्हणून सरकारने खारघर घटनेची न्यायालयीन चौकशी करावी अशी आमची मागणी आहे. या घटनेतील सत्य जनतेसमोर यावे यासाठी काँग्रेस पक्ष दिनांक २४ एप्रिल रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात पत्रकार परिषद घेणार आहे, अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिली आहे.
यासंदर्भात माहिती देताना अतुल लोंढे पुढे म्हणाले की, खारघरमधील घटनेत १४ लोकांचे मृत्यू झाल्याची सरकारी आकडेवारी आहे परंतु ही संख्या जास्त आहे सरकार मात्र मृतांची खरी संख्या बाहेर येऊ देत नाही. शिंदे सरकार या घटनतील सत्य लपवत आहे. ५०० पेक्षा जास्त लोक उपचार घेत आहेत ही संख्या सुद्धा जास्त आहे पण सरकार वस्तुस्थिती जनतेसमोर येऊ देत नाही. खारघरमधील १४ बळींच्या घटनेवर शिंदे सरकार मूग गिळून गप्प असले तरी आम्ही सरकारला स्वस्थ बसू देणार नाही. भाजपाप्रणित शिंदे सरकारला खारघर प्रकरणी सत्य सांगावेच लागेल.
खारघर प्रकरणी २४ एप्रिल रोजी प्रदेश काँग्रेसच्या वतीने राज्यातील सर्व जिल्ह्यात पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात हे अहमदनगर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पुणे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण नांदेड, अमरावती येथे माजी मंत्री यशोमती ठाकूर, नागपूर येथे माजी मंत्री सुनिल केदार, चंद्रपूरात माजी मंत्री विजय वडेट्टीवार, लातूरमध्ये माजी मंत्री अमित देशमुख, कोल्हापूरमध्ये विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील, सांगलीत माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम, प्रदेश कार्याध्यक्ष नसिम खान ठाणे, आ. कुणाल पाटील धुळे, आ. प्रणिती शिंदे सोलापूर, बसवराज पाटील धाराशीव, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे सातारा, यांच्यासह सर्व जिल्ह्यात काँग्रेसचे नेते पत्रकार परिषद घेणार आहेत.