लम्पी आजाराने पशुधन गमावलेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 02:40 PM2022-09-12T14:40:27+5:302022-09-12T14:43:01+5:30

Ajit Pawar : राज्यातील  दुधउत्पादक शेतकऱ्यांसमोर पशुधनावरील लम्पी त्वचा आजाराने गंभीर संकट उभं राहीलं असून राज्य सरकारने वेळीच याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली

Leader of Opposition Ajit Pawar demanded compensation for farmers who lost their livestock due to lumpy disease | लम्पी आजाराने पशुधन गमावलेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी

लम्पी आजाराने पशुधन गमावलेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी

Next

मुंबई - देशातील राजस्थान, पंजाब, हरयाणासारख्या राज्यांनंतर महाराष्ट्रातील पशुधनालाही विषाणूजन्य लम्पी त्वचारोगाचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. सद्यस्थितीत राज्यातल्या १७ जिल्ह्यातल्या ५९  तालुक्यात हजारो जनावरे लम्पी आजारानं ग्रस्त असून त्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. पशुधनांमधील लम्पीचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी दुधउत्पादक शेतकऱ्यांमध्ये जागृती आणि जनावरांच्या लसीकरणाचा व्यापक कार्यक्रम राज्य सरकारने हाती घ्यावा. लम्पीग्रस्त जनावरांच्या दुधाबद्दल नागरिकांच्या मनात असलेला संभ्रम, भीती दूर करण्यासाठी मोहिम राबवावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विशेष पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारकडे केली. लम्पी आजाराकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात राज्यात दुधउत्पादनाचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, ते राज्याला परवडणारं नाही, असा इशाराही अजित पवार यांनी दिला.

राज्यातील  दुधउत्पादक शेतकऱ्यांसमोर पशुधनावरील लम्पी त्वचा आजाराने गंभीर संकट उभं राहीलं असून राज्य सरकारने वेळीच याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावे, अशी मागणी करताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, १९२९ पासून आफ्रिकेत आढळणारा लम्पी आजार २०१९ मध्ये पहिल्यांदा आपल्या देशात ओरीसा राज्यात आढळला. मार्च २०२० मध्ये गडचिरोलीत सिरोंचा येथे राज्यातील पहिल्या लम्पीग्रस्त जनावराची नोंद झाली. आजमितीस राज्यातल्या १७ जिल्ह्यातल्या ५९  तालुक्यात या रोगाचा प्रसार झाला आहे. लम्पीग्रस्त जनावरांच्या नाकातील स्त्राव, डोळ्यातील पाणी आणि लाळेतून विषाणू बाहेर पडतो आणि चारा व पाण्याद्वारे त्याचा जनावरांमध्ये प्रसार होतो. येणाऱ्या काळात साखर कारखाने सुरु झाल्यानंतर ऊसवाहतूक करणाऱ्या जनावरांचे जत्थे बघता त्याठिकाणी आजार वेगाने पसरण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती मोहिम तातडीने हाती घ्यावी. जनावरांच्या लसीकरणाची मोहिम व्यापक करावी. देशात केवळ दोन कंपन्या या लसीचे उत्पादन करत असल्याने महाराष्ट्रात उत्पादन होणारी लस राज्याला अधिकाधिक प्रमाणात मिळेल यासाठी प्रयत्न करावा. आवश्यकतेनुसार परदेशातून लस आयात करुन जनावरांना देण्यात यावी. शेतकऱ्यांचं पशुधन लम्पी आजारापासून वाचवण्याचा सरकारने सर्वतोपरी प्रयत्न करावा, अशी मागणीही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

विरोधी पक्षनेते अजित पवार पुढे म्हणाले की, लम्पी आजाराने पशुधन गमावलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून भरपाई मिळावी. पशुधनाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडून सक्तीने कर्जवसुली होऊ नये. या आजाराला विमा संरक्षण नसल्याने ते मिळवून देण्यासाठी सरकारने विमा कंपन्यांशी चर्चा करावी. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांनी यासंदर्भात राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही विरोधी पक्षनेत्यांनी केली.

Web Title: Leader of Opposition Ajit Pawar demanded compensation for farmers who lost their livestock due to lumpy disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.