पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देऊनही पुढची कारवाई झाली नसेल, तर...; अजित पवार संतापले!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2022 12:25 PM2022-09-25T12:25:06+5:302022-09-25T12:28:35+5:30
पुण्यातील या संतापजनक प्रकरणानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मुंबई- पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी आंदोलन केले होते. यावेळी 'पाकिस्तान झिंदाबाद' घोषणा दिल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. 'पाकिस्तान झिंदाबाद' अशा घोषणा दिल्या का, याचा तपास करण्यात येणार असून, बेकायदेशीर जमाव जमविल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी दिली.
तुमचा धर्म घेऊन पाकिस्तानात चालते व्हा; आमच्या देशात हे चालणार नाही, राज ठाकरे आक्रमक
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या समर्थकांना एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणेने ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि. २३) जिल्हाधिकारी कार्यालयावर पीएफआय संघटनेच्या समर्थकांनी आंदोलन केले होते. व्हायरल व्हिडिओमध्ये आंदोलक घोषणा देताना दिसत आहेत. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, अल्ला हो अकबर अशा घोषणा दिल्या जात होत्या. पाकिस्तान झिंदाबादची घोषणा दिल्याचा दावा करीत व्हिडिओ व्हायरल केले गेले.
पुण्यातील या संतापजनक प्रकरणानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अजित पवार म्हणाले की, पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देऊनही पुढची कारवाई झाली नसेल, तर मी नक्कीच राजयाचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना सदर प्रकरणाची माहिती देऊन, संबंधितांवर ताबडतोब कारवाई करण्यास सांगेन. तसेच सदर प्रकार महाराष्ट्रात घडतोय, हे लाजिरवाणी बाब आहे. हे कदापि घडता कामा नये. अशा प्रकारच्या गोष्टी जिथल्या तिथे थांबल्या गेल्या पाहिजे. त्याचप्रमाणे याचा सूत्रदार कोण आहे, याचाही तपास व्हावा, अशी मागणी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याची माहिती अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
बेकायदा आंदोलन करून घोषणाबाजी केल्याप्रकरणी ४१ जणांना ताब्यात घेत गुन्हे नोंदविले, असे बंडगार्डन ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी सांगितले. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे करणार असल्याचे मूलनिवासी मुस्लीम मंचचे अध्यक्ष अंजुम इनामदार यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल-
मुख्यमंत्री ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे. या ठिकाणी पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावण्याचा कोणालाही अधिकार नाही. अशी नारेबाजीची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. गृह विभाग कठोर कारवाई करेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.