'वैयक्तिक निंदा-नालस्ती कधीच करु नये'; एकनाथ शिंदेंच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 01:18 PM2022-08-23T13:18:05+5:302022-08-23T13:20:02+5:30

तुमचा सगळा प्रवास मला माहिती आहे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सोमवारी विधानसभेत निशाणा साधला.

Leader of Opposition Ajit Pawar has expressed the opinion that one should never criticize anyone personally. | 'वैयक्तिक निंदा-नालस्ती कधीच करु नये'; एकनाथ शिंदेंच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया

'वैयक्तिक निंदा-नालस्ती कधीच करु नये'; एकनाथ शिंदेंच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया

Next

मुंबई- तुमचा सगळा प्रवास मला माहिती आहे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सोमवारी विधानसभेत निशाणा साधला. देवेंद्र फडणवीसांनी तुमच्यावर तेव्हा ‘प्रेम, दया, करुणा’ दाखवली. पण, परत परत ती दाखविता येणार नाही, असे सूचक उद्गार शिंदे यांनी मुंडेंबाबत काढले होते. एकनाथ शिंदेंच्या या विधानावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सभागृहात भाष्य केलं आहे. 

आरोप-प्रत्यारोप होतच असतात. आम्ही आमची भूमिका मांडतो, सत्ताधारी पक्ष त्यांची भूमिका मांडतात. फक्त माझं मत आहे की, वैयक्तिक निंदा-नालस्ती कधीच कुणी कुणाची करू नये. महाराष्ट्राची एक वेगळी संस्कृती, परंपरा आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या कामाचा एक दर्जा आहे, असं अजित पवारांनी सांगितलं. 

धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री शिंदे विधान भवनाच्या पायऱ्या चढत असताना जोरदार घोषणाबाजी गेल्या आठवड्यात केली होती. ‘पन्नास खोके, एकदम ओके’,‘ताट, वाटी चलो गुवाहाटी’ अशा घोषणा देण्यात मुंडे पुढे होते. आज थेट नगराध्यक्ष निवडीसंबंधीच्या विधेयकावर बोलताना शिंदे यांनी मुंडे यांना लक्ष्य केले. धनंजय मुंडे परवा मोठमोठ्याने ओरडत होते, ‘चलो गुवाहाटी... चलो गुवाहाटी...’ अगदी बेंबीच्या देठापासून ते ओरडत होते. जणू काय ते खूप वर्षांपासूनचे शिवसैनिक आहेत. आता, यांच्याबद्दल काय बोलावे, असे एकनाथ शिंदे म्हणाले होते.

धनंजय मुंडे अधिवेशनाच्या नियमित कामकाजासाठी सभागृहात दाखल झाले आहेत. मात्र आज विरोधकांनी राज्य सरकारच्या विरोधात विधानसभेच्या पायऱ्यांवर उभे राहत घोषणा दिल्या. मात्र यावेळी धनंजय मुंडे कुठे दिसले नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी सभागृहात केलेलं विधानामुळे धनंजय मुडेंनी माघार घेतली की काय?, अशी चर्चा सुरु झाली आहे. 

एकनाथच राहा, ‘ऐकनाथ’ होऊ नका- धनंजय मुंडे

नगराध्यक्ष पदाबाबत नगरविकास मंत्री म्हणून घेतलेला निर्णय भाजपच्या दबावामुळे मुख्यमंत्री शिंदे यांना बदलावा लागला हे दुर्दैवी आहे. राज्याचे नाथ म्हणवणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी ‘एकनाथ’च राहावे, ‘ऐकनाथ’ होऊ नये, अशी कोपरखळी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावली. सत्ता बदलताच मुख्यमंत्र्यांनी स्वत:चा निर्णय स्वत:च बदलला, हे ऐकनाथ झाल्याचे लक्षण असल्याची मिश्कील टिप्पणी मुंडेंनी केली.

Web Title: Leader of Opposition Ajit Pawar has expressed the opinion that one should never criticize anyone personally.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.