तुम्हाला कोणत्या राजकारणत इंटरेस्ट आहे?; पत्रकारांच्या प्रश्नावर अजितदादा म्हणाले, स्टॅम्प पेपरवर लिहून देतो!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 09:16 PM2023-06-10T21:16:27+5:302023-06-10T21:18:12+5:30
अजित पवार यांच्याकडे कोणतीही जबाबदारी दिलेली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यापुढे काम पाहणार आहेत. दोघांकडे देखील वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.
'अजित पवार नाराज असल्याचं काहीजण म्हणतात, पण...'
अजित पवार यांच्याकडे कोणतीही जबाबदारी दिलेली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र अजित पवार यांनी ट्विट करत सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांचं अभिनंदन केलं आहे. तसेच सायंकाळी माध्यमांशी संवाद साधताना मला राज्यातील राजकारण इंटरेस्ट असल्याचं म्हटलं आहे.
तुम्हाला कोणत्या राजकारणात इंटरेस्ट आहे?, असा असाव पत्रकारांनी अजित पवारांना विचारला. यावर मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, मला महाराष्ट्रातल्या राजकारण इंटरेस्ट आहे. मला राज्याचे प्रश्न विचारा आणि राष्ट्रीय पातळीवरचे प्रश्न आमच्या राष्ट्रीय नेत्यांना विचारा, असं मी नेहमी पत्रकारांना देखील सांगत असतो, असं अजित पवार म्हणाले.
पक्षाने माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी कटिबद्ध आहे - सुप्रिया सुळे
दरम्यान, अजित पवार हे राज्याचे विरोधी पक्षनेते आहे आणि जयंत पाटील यांच्याकडे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद आहे. त्यामुळे त्यांना कोणतीही जबाबदारी नाही. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे तशी कोणतीही जबाबदारी नव्हती, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. अजित पवार नाराज आहे असं काहीजण म्हणतात. पण यामध्ये काही तथ्यं नसल्याचेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले.
सुप्रिया सुळेंनी मानले आभार-
कार्यकारी अध्यक्ष पदावर नेमणूक झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी पक्षाचे आभार मानले आहेत. अजित पवार यांनी देखील ट्विटच्या माध्यमातून नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात आलेल्या नेत्यांचे अभिनंदन केले. आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली हृदयात महाराष्ट्रनजरे समोर राष्ट्र हा विचार घेऊन रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या आणि राज्याच्या जडण-घडणीत मोलाचं योगदान देईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी याच ध्येयानं कामं करतील हा विश्वास आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं पुन:श्च अभिनंदन, असे अजित पवारांनी म्हटले आहे.