विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे जाणार; चव्हाण, थोरात, पटोले, वडेट्टीवार यांची नावे चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 07:09 AM2023-07-03T07:09:08+5:302023-07-03T07:10:22+5:30
विरोधी पक्षांचा विचार करता काँग्रेस हा विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष असेल. या पक्षाचे ४५ आमदार आहेत.
मुंबई : विरोधी पक्षनेते आणि प्रतोदपदी जितेंद्र आव्हाड यांच्या नियुक्तीचे शिफारस पत्र राष्ट्रवादीने दिले असले तरीही काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची दाट शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, काँग्रेसचे पक्षनेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर यांची नावे या दृष्टीने चर्चेत आहेत.
विरोधी पक्षांचा विचार करता काँग्रेस हा विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष असेल. या पक्षाचे ४५ आमदार आहेत. त्यामुळे साहजिकच विरोधी पक्षनेतेपद हे काँग्रेसकडे चालून जाईल. ठाकरे गटाचे केवळ १५ आमदार आहेत. त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळणार नाही. ठाकरे गटाचे अंबादास दानवे हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्याकडेच उद्धव ठाकरे यांच्यासह ११ आमदार आहेत.
तथापि, ठाकरे गटात फूट पाडण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. ठाकरे गटाखालोखाल राष्ट्रवादीचे नऊ आणि काँग्रेसचे नऊ आमदार विधान परिषदेत आहेत. मात्र, आता राष्ट्रवादीचे नऊपैकी सहा आमदार हे अजित पवार यांच्यासोबत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे विधानसभेपाठोपाठ विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे जाऊ शकते. हे राजकीयदृष्ट्या सोयीचे होणार नाही, असे सत्तापक्षाला वाटले तर ठाकरे गटात तूर्त फूट न पाडता विरोधी पक्षनेतेपद हे त्यांच्याकडेच राहील असेही होऊ शकते.