नातेवाइकांच्या प्रतिष्ठेसाठी नेते अडकले मतदारसंघांत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 07:05 AM2019-04-06T07:05:55+5:302019-04-06T07:06:58+5:30

अजित पवार, पंकजा मुंडे, शिंदे, विखे आदींची अस्मिता पणाला : जावयाच्या उमेदवारीने दानवे यांची अडचण

Leaders are trapped in the constituencies for relatives | नातेवाइकांच्या प्रतिष्ठेसाठी नेते अडकले मतदारसंघांत

नातेवाइकांच्या प्रतिष्ठेसाठी नेते अडकले मतदारसंघांत

Next

यदु जोशी

मुंबई : जवळचे नातेवाइक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असल्याने राज्यात सर्वच प्रमुख पक्षांचे नेते हे त्या-त्या मतदारसंघात अडकून पडल्याचे दिसत आहेत. अजित पवार यांचे पूर्ण कुटुंब मावळमध्ये पार्थसाठी प्रचारात उतरले आहे. शिवाय बारामतीत सुप्रिया सुळेंसाठी भाऊ अजितदादा किल्ला लढवत आहेत.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची परिस्थिती विचित्र आहे. ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पण त्यांचे पुत्र सुजय हे अहमदनगरमध्ये भाजपचे उमेदवार आहेत. सिनिअर विखे हे मुलाच्या प्रचारार्थ फिरत आहेत. भाजपच्या मंचावर तेवढे ते जात नाहीत, पण प्रचाराची समांतर यंत्रणा त्यांनी उभारली आहे. याच मतदारसंघात भाजपचे नगर जिल्ह्यातील राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे जावई (मुलीचे पती) आ.संग्राम जगताप हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. विखे यांनी पक्षनिष्ठा बाजूला ठेवली असली तरी कर्डिले हे पक्षनिष्ठा कायम ठेवत भाजपचे सुजय विखे यांचा प्रचार करीत आहेत.

बीडमध्ये भाजपच्या प्रीतम मुंडे विरुद्ध राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे असा सामना असला तरी खरा संघर्ष ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे विरुद्ध त्यांचे चुलत बंधू आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे असाच आहे. हाणामाऱ्यांच्या विविध घटनांनी हा संघर्ष किती तीव्र आहे याची प्रचिती येत आहे. बहिणीच्या प्रचाराची कमान सांभाळणाऱ्या पंकजा मुंडे बीडमध्ये जास्तीतजास्त वेळ देऊन इतर मतदारसंघांमध्येही भाजपच्या प्रचाराला जात आहेत.

कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचाराची धूरा त्यांचे वडील आणि राज्याचे सार्वजनिक आरोग्य व सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी हाती घेतली आहे. शिवाय ठाण्याचा शिवसेनेचा गड टिकवण्याची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. रावेरमध्ये सून रक्षा खडसे पुन्हा रिंगणात असताना माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी संपूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी उभी केली आहे. प्रकृती साथ देत नसली तरी ते गड लढवत आहेत.पुतण्या समीर भुजबळचे (नाशिक) राजकीय भवितव्य ठरविणारी लढत माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे
नेते छगन भुजबळ यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे हे जावई हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे काहीसे कैचीत सापडले आहेत. दानवे स्वत: जालनामधून लढत आहेत आणि कन्नडचे आमदार असलेले हर्षवर्धन जाधव यांनी बाजूच्या औरंगाबादमध्ये अपक्ष म्हणून अर्ज भरत शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांच्या नाकात दम आणला आहे. जावयाची समजूत काढता काढता दानवेंची कसरत होत आहे. हर्षवर्धन यांनी उमेदवारी कायम ठेवली तर जालन्यातील शिवसैनिक असहकार करतील, अशी भाजपला भीती वाटते. नात्यांची गुंतागुंत कोल्हापुरातही बघायला मिळते. राष्ट्रवादीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांचा सामना शिवसेनेचे संजय मंडलिक यांच्याशी होत आहे. धनंजय यांचे चुलत बंधू आणि कोल्हापूरचे भाजप आमदार अमल महाडिक हे युतीच्या प्रचाराच्या पहिल्या सभेत मंचावर होते पण नंतर फारसे प्रचारात दिसलेले नाहीत. त्यांच्या पत्नी शौमिका या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत आणि त्याचा गण हा हातकणंगले लोकसभा मतदारसंघात येतो. तेथे शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांचा उमेदवारी अर्ज भरताना त्या हजर होत्या पण
नंतर प्रचारात फारशा सक्रिय नाहीत.



फडणवीस सरकारमधील मंत्र्यांची प्रतिमाही पणाला
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस सरकारमधील काही मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यात, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील (कोल्हापूर, सांगली, माढा), सुधीर मुनगंटीवार (चंद्रपूर, वर्धा), सुभाष देशमुख, विजय देशमुख (सोलापूर, माढा), संभाजी पाटील निलंगेकर (लातूर), गिरीश महाजन (जळगाव), प्रकाश मेहता (ईशान्य मुंबई), विनोद तावडे (उत्तर मुंबई) यांचा समावेश आहे.
 

Web Title: Leaders are trapped in the constituencies for relatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.