विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार, दोन्ही चव्हाणांच्या नावाची चर्चा
By अतुल कुलकर्णी | Updated: November 30, 2019 06:53 IST2019-11-30T03:14:13+5:302019-11-30T06:53:57+5:30
विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार, दोन्ही चव्हाणांच्या नावाची चर्चा
- अतुल कुलकर्णी
मुंबई : विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार हे जवळपास निश्चित झाले आहे. काँग्रेसमधून अद्याप यासाठी नाव निश्चित झालेले नाही. उद्या सकाळी दिल्लीहून नाव येईल आणि त्यानंतर अर्ज दाखल केला जाईल, असे सांगण्यात येत आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, प्रभारी मल्लिकार्जून खर्गे हे गुरुवारीच दिल्लीला गेले आहेत.
विधानसभा अध्यक्षपद राष्ट्रवादीने घ्यावे व उपमुख्यमंत्रीपद काँग्रेसला द्यावे, अशी मागणी काँग्रेसने केली होती. मात्र, तिन्ही पक्षांच्या समन्वय समितीच्या बैठकीत काँग्रेसने अध्यक्षपदाची मागणी केली होती. त्यात आता बदल करणे योग्य होणार नाही, असे सांगून राष्ट्रवादीने अध्यक्षपद घेण्यास नकार दिला.
आता काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण या दोघांपैकी एकाचे नाव निश्चित होईल, असे सांगितले जात आहे.
उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे देण्यात येणार आहे. राष्ट्रवादीने या पदासाठी अद्याप नावाची निश्चिती केलेली नाही. रात्री उशिरापर्यंत सिल्वर ओक येथे शरद पवार, प्रफुल्ल पटेल, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील यांच्यात चर्चा सुरू होती. तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या नरिमन पॉईंट कार्यालयात अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आदींची बैठक झाली.
मंत्रिमंडळाचा विस्तार विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर करण्याची सरकारची इच्छा आहे. मात्र, दोन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून यावर एकमत करतील. त्यानंतरच विस्ताराचा मार्ग मोकळा होईल. कदाचित नागपूर अधिवेशनापर्यंत विस्तार होईल की नाही याविषयी साशंकता आहे.