विधान परिषदेची निवडणूक काँग्रेसभोवती; जादा मतांच्या पळवापळवीचे प्रयत्न सुरू
By यदू जोशी | Published: July 11, 2024 09:53 AM2024-07-11T09:53:08+5:302024-07-11T09:53:21+5:30
११ जागांसाठीची ही निवडणूक १२ जुलै रोजी होणार आहे.
मुंबई : जादाची १४ मते असलेल्या काँग्रेस पक्षाला विधान परिषदेच्या निवडणुकीत कमालीचे महत्त्व आले आहे. प्रत्येकच पक्ष काँग्रेसची मते आपल्याकडे वळविण्याच्या प्रयत्नात आहे. ११ जागांसाठीची ही निवडणूक १२ जुलै रोजी होणार आहे.
विधानसभेतून परिषदेवर निवडून द्यावयाच्या ११ जागांची ही निवडणूक रंगतदार झाली आहे. एक जागा निवडून आणण्यासाठी २३ मतांचा कोटा प्रत्येक पक्षाला लागणार आहे. काँग्रेसचे ३७ आमदार आहेत आणि एकच उमेदवार (प्रज्ञा सातव) आहेत. त्या आरामात निवडून येतील. जोखीम नको म्हणून पहिल्या पसंतीची २७ मते त्यांना द्यावी असे काँग्रेसने ठरविले असल्याचे सांगण्यात आले.
अजित पवार गटाला दगाफटका?
अजित पवार गटाला दगाफटका होऊ शकतो. शरद पवार हे अजित पवार गटातील काही आमदारांची मते खेचतील, अशीही जोरदार चर्चा आहे. आमचे एकही मत फुटणार नाही, असे अजित पवार गटातील वरिष्ठ नेते सांगत आहेत.
महायुतीतील तिन्ही पक्षांची एकत्रित रणनीती मात्र अद्याप ठरलेली नाही. काही मते आमच्याकडे येऊ शकतात, पण त्यासाठी विशेष प्रयत्न होताना दिसत नाहीत, असे भाजपच्या एका नेत्याने नाव न देण्याच्या अटीवर सांगितले.
काँग्रेसची १० मते ठरणार निर्णायक
सातव यांना २७ मते दिली, तरी काँग्रेसकडे १० मते उरतात. ही १० मते कोणाकडे जातील, महाविकास आघाडीतील अन्य दोन उमेदवारांना (जयंत पाटील आणि मिलिंद नार्वेकर) यांच्याकडे ती जातील की, फुटतील याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाचे उमेदवार भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांच्यासाठी मतांची व्यवस्थित तजवीज केली आहे. काँग्रेसकडील जादा मते आपल्याकडे वळविण्यासाठी अन्य पक्षांमध्येही स्पर्धा आहे.
कोणते उमेदवार डेंजर झोनमध्ये?
अजित पवार गटाचे शिवाजी गर्जे, शेकापचे (शरद पवार समर्थित) जयंत पाटील, उद्धव सेनेचे मिलिंद नार्वेकर किंवा भाजपचे पाचपैकी एक यांच्यातील कोणीही एक जण पराभूत होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.
नार्वेकर आणि जयंत पाटील यांचे लहानमोठ्या अन्य पक्षांमधील नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत, त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो. खोत, गोरखेंसह भाजपच्या पाचही उमेदवारांची मुख्य भिस्त ही पक्षाकडे असलेल्या ११२ मतांवर आहे.
भाजपला बाहेरून किमान ३ ते ५ मते खेचून आणावी लागतील. त्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी रणनीती आखली असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.