१२ सदस्यांच्या नियुक्तीबाबत योग्य निर्णय घेऊ; राज्यपालांचे राज्य सरकारला आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 08:19 AM2021-09-02T08:19:22+5:302021-09-02T08:19:36+5:30
योग्य निर्णय घेऊ एवढेच राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना सांगितल्याने त्यांच्याकडून कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नसल्याचे म्हटले जाते.
मुंबई : विधान परिषदेवरील १२ राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नियुक्तीबाबत आपण योग्य तो निर्णय घेऊ, असे आश्वासन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना दिले. या तिघांनीही सायंकाळी राज्यपालांची भेट घेऊन या नियुक्ती लवकरात लवकर करण्याची विनंती केली.
योग्य निर्णय घेऊ एवढेच राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना सांगितल्याने त्यांच्याकडून कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नसल्याचे म्हटले जाते. मुख्यमंत्री व इतर दोन नेत्यांनी या नियुक्ती लवकरात लवकर करण्यासंदर्भात एक विनंती पत्रही राज्यपालांना दिले.या नियुक्तींवरून राजभवन विरुद्ध राज्य सरकार यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून तणाव असल्याचे चित्र आहे. गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री ठाकरे हे राज्यपालांना या विषयावर भेटणार होते; पण राजभवनकडे वेळच मागण्यात आलेली नव्हती, असे स्पष्ट करण्यात आले तर राज्यपालांनी भेट नाकारल्याचा आरोप काँग्रेसने केला होता.
शेवटी बुधवारी ही भेट झाली. उपमुख्यमंत्री पवार यांनी या भेटीनंतर पत्रकारांना सांगितले की, या नियुक्तींबाबत लवकर निर्णय घेण्याची विनंती तर आम्ही केलीच शिवाय राज्यातील एकूण परिस्थितीची माहिती राज्यपालांना दिली.विधान परिषदेच्या १२ जागा रिक्त राहणे सभागृहाच्या कामकाजाच्या दृष्टीनेही योग्य नाही याकडे मुख्यमंत्र्यांनी आजच्या भेटीत लक्ष वेधले. राज्यातील कोरोनाची परिस्थिती, मराठवाडा, कोकण. उत्तर महाराष्ट्रातील अलिकडच्या अतिवृष्टीबाबतही आम्ही राज्यपालांना माहिती दिली,असे पवार यांनी सांगितले.
महाविकास आघाडी सरकारने आधीच या नियुक्तीसाठी १२ जणांची नावे राज्यपालांकडे पाठविलेली आहेत. त्यातील काही नावांवर राज्यपालांचा आक्षेप असल्याचे वृत्त मध्यंतरी होते. आजच्या भेटीत त्यांनी हा आक्षेप मुख्यमंत्र्यांकडे नोंदविला का याची माहिती मिळू शकली नाही. बाळासाहेब थोरात यांनी या भेटीनंतर लोकमतला सांगितले की आता राज्यपाल लवकरात लवकर नियुक्ती करतील असा आमचा विश्वास आहे.
‘त्या’ १२ आमदारांच्या निलंबनावरही झाली चर्चा
भाजपच्या १२ आमदारांना विधानसभा अधिवेशनात एक वर्षासाठी निलंबित केले होते. याबाबतचा मुद्दा राज्यपालांनी उपस्थित केल्याची माहिती आहे. आमदारांनी अभूतपूर्व गोंधळ घातला, शिवीगाळ केली त्यामुळे निलंबनाशिवाय पर्याय नव्हता, असे मुख्यमंत्री, अजित पवार आणि थोरात यांनी यावेळी स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले.