Lockdown: काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीचे मंत्रीही उद्धव ठाकरेंवर नाराज; पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 02:51 AM2020-07-04T02:51:42+5:302020-07-04T07:00:34+5:30
लॉकडाऊनबाबत गोंधळ नको; शरद पवारांच्या मध्यस्तीनंतर आघाडीतील ‘अविश्वास’ दूर
मुंबई : कोरोनाच्या संकटकाळात लॉकडाऊनसह इतर निर्णय घेताना प्रशासनाला विश्वासात घेणे चांगलेच आहे, परंतु लोकप्रतिनिधींनाही विश्वासात घ्या, असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुक्रवारच्या भेटीत दिल्याचे समजते. खा. पवार यांच्या मध्यस्तीनंतर महाविकास आघाडीतील नेत्यांमधील अविश्वासाचे वातावरण निवळल्याचे मानले जात आहे.
दादरच्या बाळासाहेब ठाकरे स्मारकात दोन नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे उपस्थित होते. मुंबईसह वेगवेगळ्या शहरांमध्ये लॉकडाऊन कडक करताना वेगवेगळे नियम लागू केल्यामुळे लोकांमध्ये गोंधळाची स्थिती पाहायला मिळते आहे. शाळा सुरू करण्याबाबतही गोंधळाची स्थिती आहे. मंत्र्यांना न विचारताच लॉकडाऊन कडक करण्याच्या निर्णयामुळे काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीचे मंत्रीही नाराज आहेत. याबाबतच पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे.
बैठकीनंतर लॉकडाऊनबाबतचा गोंधळ दूर केला जाईल आणि अनलॉकसाठी पावले उचलताना राष्ट्रवादी व काँग्रेसच्या मंत्र्यांनाही विश्वासात घेत निर्णयांमध्ये एकसूत्रता आणली जाईल असे म्हटले जाते. त्याआधी काल अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली. त्या बैठकीत लॉकडाऊन आणि राज्याच्या आर्थिक प्रश्नांवर तसेच महाविकास आघाडीतल्या कुरबुरींवरही चर्चा झाल्याची माहिती आहे.