जागावाटपावरुन महाविकास आघाडीत वाद? सांगलीच्या जागेवरुन संजय राऊतांचा काँग्रेसला खोचक सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 01:06 PM2024-03-28T13:06:56+5:302024-03-28T13:08:07+5:30
Sanjay Raut : ठाकरे गटाने उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर काँग्रेसमधील विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी काँग्रेसच्या दिल्लीतील हायकमांडची भेट घेऊन या जागेवर पुन्हा एकदा दावा सांगितला आहे.
Sanjay Raut ( Marathi News ) : मुंबई- शिवसेना ठाकरे गटाने काल लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत सांगली लोकसभा मतदारसंघातून पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदार संघावर काँग्रेसनेही दावा सांगितला होता, या जागेवरुन आता महाविकास आघाडीमध्ये वाद असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे गटाने उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर काँग्रेसमधील विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी काँग्रेसच्या दिल्लीतील हायकमांडची भेट घेऊन या जागेवर पुन्हा एकदा दावा सांगितला आहे. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला सल्ला दिला आहे.
"सांगलीतील काँग्रेसचे व्यक्ती दिल्लीत गेली असतील, त्यांनी काही भूमिका घेतल्या असतील तरी आपण त्यावर कोणतीही कटू भावना व्यक्त करायची नाही असं आमचं ठरलं आहे. कटू भावना आपण व्यक्त करायच्या नाहीत, अशा सूचना आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. सांगलीच्या कार्यकर्त्यांच्या त्या भावना आहेत. आमच्या कोल्हापूरच्या कार्यकर्त्यांच्या भावना अशाच होत्या, पण त्या आम्ही आमच्यातच ठेवल्या बाहेर येऊ दिल्या नाहीत. अशाच भावना रामटेकमधूनही व्यक्त केल्या, अमरावतीमधील कार्यकर्त्यांनीही व्यक्त केल्या. या तिन्ही जागा आम्ही काँग्रेससाठी सोडल्या. शेवटी आपण महाविकास आघाडीसाठी लढत आहे. फक्त आपल्याच पक्षाचा विस्तार करण्यासाठी लढत नाही. सांगलीची जागा जर आम्ही एकत्र लढलो तर तिथे चंद्रहार पाटलांचा विजय होऊ शकतो, असंही संजय राऊत म्हणाले.
संजय राऊतांचा काँग्रेसला सल्ला
"काही व्यक्तिगत कारणामुळे, काही व्यक्तिगत अडचणीमुळे कोणाला भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्ष मदत करुन तिथे काही वेगळं घडवायचं असेल तर त्याला शिवसेना होऊ देणार नाही, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला. यामुळे सांगलीची जागा शिवसेना लढत आहे. आम्हाला खात्री आहे, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना सांगलीतून उत्तम पाठिंबा मिळत आहे, कोणी एकजण प्रचाराला बहिष्कार टाकत असेल तर ते महाविकास आघाडीसाठी धोकादायक आहे. मग संपूर्ण महाराष्ट्रात असंच चित्र निर्माण झालं तर त्याला जबाबदार कोण असेल? काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. काँग्रेस देशाचं नेतृ्त्व करत आहे. प्रधानमंत्री काँग्रेसचा व्हावा ही आमची भूमिका आहे, एका जागेसाठी पंतप्रधानपद घालवणार का? हा त्यांनी विचार करायचा आहे, असा सल्ला खासदार संजय राऊत यांनी दिला.