Ajit Pawar : शरद पवारांसोबत पुन्हा एकत्र येणार का? अजित पवारांनी सगळंच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 05:45 PM2024-04-20T17:45:08+5:302024-04-20T17:57:38+5:30
Ajit Pawar On Sharad Pawar : आज दिलेल्या मुलाखतीमध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादीतील दोन्ही गट भविष्यात एकत्र येऊ शकतात यावर भाष्य केलं आहे.
Ajit Pawar On Sharad Pawar : बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार पवार अशी लढत निश्चित झाली आहे. सुप्रिया सुळे यांचा प्रचार कालपासून सुरू झालं, तर सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज झाला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषण केले. यावेळी पवार यांनी खासदार शरद पवार यांच्यासह आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गट एकत्र येऊ शकतात अशी चर्चा सुरू आहे. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बारामतीत मोठा ट्विस्ट! अजितदादांनी 'पवार' नावाला मत द्या म्हटले; तिकडे शरद पवारांचा अर्ज मंजूर झाला
'इंडिया टुडे'ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये उपमुख्यमंत्री पवार यांनी यावर भाष्य केलं आहे. "आमचा पक्ष सेक्युलर आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे, त्यावरच आम्ही पुढे जात आहे. आमच्या या विचारावर कोणीही आक्षेप घेतलेला नाही, आम्हाला २००४ सारखे आमदार निवडणून आणायचे आहेत.जर मला महाराष्ट्राने पाठिंबा दिला, आमदारांनी पाठिंबा दिली. १४५ आमदारांचा आकडा आम्हाला जुळवला तर मी मुख्यमंत्री बनू शकतो, असंही अजित पवार म्हणाले.
"आमच्या सर्व नेत्यांनी आणि आमदारांनी जी लाईन घेतली आहे, ती लाईन त्यांना ठिक वाटली तर आम्हाला काही हरकत नाही. त्या गटातील नेत्यांना यायचं असेल तर ते येऊ शकतात, असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
बारामतीमध्ये अजित पवार यांनी विरोधकांवर टीका केली
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचा प्रचार करणाऱ्या पवार कुटुंबातील सदस्यांवर निशाणा साधताना अजित पवार म्हणाले की, "काल कुटुंबातील सगळे लोक साहेबांच्या पायाशी बसले होते. याआधी असं कधी घडलं नव्हतं. मात्र आता लोकांना भावनिक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसंच आमचे चिरंजीव म्हणाले की, सगळ्या संस्था साहेबांनीच आणल्या. मग मागच्या ३०-३५ वर्षांत आम्ही काहीच केलं नाही का? आणि अनेक संस्था बारामतीत आधीपासूनच होत्या. छत्रपती कारखाना कुणी काढला, माळेगाव कारखाना कुणी काढला, हे सगळ्यांना माहीत आहे. विद्या प्रतिष्ठानची स्थापना साहेबांनी केली. मात्र १९९१ साली मी खासदार झाल्यानंतर त्या संस्थेचा वेगाने विस्तार केला," असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.