मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 04:16 AM2024-05-03T04:16:04+5:302024-05-03T04:17:31+5:30
आयोगाने पहिल्या टप्प्याच्या मतदानानंतर ११ दिवसांनी सुधारित टक्केवारी जाहीर केली. तर दुसऱ्या टप्प्याच्या मतदानानंतर ४ दिवसांनी सुधारित टक्केवारी जाहीर केली आहे.
मुंबई : निवडणूक आयोगाने राज्यातील पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची आकडेवारी तब्बल ११ दिवस उशिराने जाहीर केल्यानंतर आता विरोधी पक्षांकडून आयोगाच्या आकडेवारीवर संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी काँग्रेसने तर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवला आहे.
आयोगाने पहिल्या टप्प्याच्या मतदानानंतर ११ दिवसांनी सुधारित टक्केवारी जाहीर केली. तर दुसऱ्या टप्प्याच्या मतदानानंतर ४ दिवसांनी सुधारित टक्केवारी जाहीर केली आहे. इतक्या उशिराने जाहीर केलेल्या या टक्केवारीनुसार मतदानात ३ ते ५.७५ टक्के वाढ झाल्याचे दाखवण्यात आले आहे. यापूर्वी कधीच एवढ्या उशिरा टक्केवारी जाहीर झाली नाही. तसेच इतकी वाढही झाली नसल्याचे सांगत विरोधकांनी याबाबत संशय व्यक्त केला आहे.
आयोगाने किती मतदान झाले तो आकडा जाहीर केला नाही, केवळ टक्केवारी जाहीर केली. ही काळजी करण्यासारखी स्थिती आहे. खोलात जाऊन माहिती घ्यावी लागेल.
- शरद पवार, शरद पवार गट
सहा वाजल्यानंतर रांगेत जेवढे लोक आहेत, त्यांचे मतदान आठ ते नऊ वाजेपर्यंत चालते. त्यामुळे आयोगाच्या टक्केवारीबाबत एवढ्या खाली जाऊन राजकारण करू नये.
- चंद्रशेखर बावनकुळे, भाजप
हा अत्यंत गंभीर विषय समोर आल्याने निवडणूक आयोगावर किती विश्वास ठेवायचा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आयोगाची कार्यपद्धती संशयास्पद वाटते आहे.
- संजय राऊत, उद्धवसेना
आयोगाने मतदानानंतर काही दिवसांनी पुन्हा वेगळी आकडेवारी जाहीर केली. फॉर्म ७६ सी नुसार टक्केवारी आहे, त्यात वाढ करत असाल तर ते मान्य नाही.
- नाना पटोले, काँग्रेस