आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 05:39 AM2024-05-17T05:39:28+5:302024-05-17T05:42:14+5:30
संपूर्ण राज्याचे लक्ष मुंबईतील सभांकडे, १३ जागांसाठी सर्वांनी ताकद लावली पणाला
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात महत्त्वाची मानली जाणारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा उद्या, शुक्रवारी शिवाजीपार्क येथे होणार आहे. या प्रचारसभेनिमित्त महायुतीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे.
महायुतीच्या मुंबईतील सहा उमेदवारांचा आत्मविश्वास वाढवून मतदारांना विकासाच्या मुद्द्यावर मतदान करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांच्याकडून अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे संविधान, गुजराती- मराठी मुद्दा तसेच आणि महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याच्या विरोधकांच्या टीकेला पंतप्रधान मोदी कशा पद्धतीने उत्तर देतात याबाबत उत्सुकता आहे.
मुंबईच्या सहा जागांसाठी सोमवारी मतदान आहे. शनिवारी संध्याकाळी ५ वाजता मुंबईतला प्रचार अधिक़तरित्या बंद होईल. शुक्रवारच्या सभेला रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले हेदेखील उपस्थित असतील.
राज्यात पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी-राज एका व्यासपीठावर
राज ठाकरेंनी काही वर्षांपूर्वी गुजरात दौरा केला होता, त्या दौऱ्यादरम्यान मोदी-राज ठाकरे एकत्र होते. मात्र महाराष्ट्रात, विशेषत: मुंबईत पहिल्यांदाच दोघे एका व्यासपीठावर असणार आहेत. पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे हे दोघेही फर्डे वक्ते आहेत.
अजित पवार हजर राहणार का?
पंतप्रधानांच्या रोड शोला अजित पवार अनुपस्थित होते. त्यांना घशाचा संसर्ग झाल्याचे दुसऱ्या दिवशी स्पष्ट झाले असल्याने ते या सभेला उपस्थित राहणार का, आणि राहिले तर बोलणार का, याबाबत शंका व्यक्त केल्या जात आहेत.
सभेला महत्त्वाचे नेते : पंतप्रधान नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार तसेच राज ठाकरे
सभेची वेळ : सायं. ५ वाजता
बीकेसीमध्ये ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
राज्यातील शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचाराची सांगता शनिवारी होत असताना इंडिया आघाडीची राज्यातील प्रचाराची सांगता सभा शुक्रवारी मुंबईतील बीकेसी मैदानावर होत आहे. बीकेसी मैदानावर होणाऱ्या या सांगता सभेत मोठे शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी इंडिया आघाडीने केली आहे. जामिनावर बाहेर असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या या सभेतील भाषणाकडे सगळ्यांचे लक्ष असेल.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता १७ मार्च रोजी शिवाजी पार्कवरील जाहीर सभेने झाली होती. या सभेला इंडिया आघाडीमधील सर्व पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. याच सभेने इंडिया आघाडीच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ केला होता. आता सांगता बीकेसी मैदानावर होत आहे.
उद्धव सेनेने केली हाेती शिवाजी पार्क मैदानाची मागणी
उद्धव सेनेकडून शिवाजी पार्क मैदानाची मुंबई महापालिकेकडे मागणी करण्यात आली होती. मनसेनेही शिवाजी पार्कसाठी अर्ज केला होता. मात्र मैदान मनसेला महायुतीच्या सभेसाठी देण्यात आल्याने इंडिया आघाडीला बीकेसी मैदान निवडावे लागले.
राहुल गांधी यांची उपस्थिती का नाही?
या सांगता सभेला राहुल गांधी उपस्थित राहणार नाहीत. ते रायबरेलीतून निवडणूक लढवत असून तिथेही २० मे रोजी मतदान होत आहे. त्यामुळे ते या सभेला उपस्थित नसतील. १८ मे रोजी इंडिया आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे.
सभेला महत्त्वाचे नेते : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल
सभेची वेळ : सायं. ६ वाजता