महाराष्ट्रात काँग्रेसचा डंका! 'हात'चे गमावलेले 'हे' सहा गड पुन्हा मिळवले
By संतोष कनमुसे | Published: June 4, 2024 10:03 PM2024-06-04T22:03:49+5:302024-06-04T22:07:46+5:30
Lok Sabha Election Result 2024 : देशात आज लोकसभा निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. राज्यात महाविकास आघाडीचं आघाडीवर असल्याचं दिसत आहे.
Lok Sabha Election Result 2024 ( Marathi News ) : देशात २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी यांची मोठा लाट होती. या लाटेत काँग्रेसने महाराष्ट्रातील अनेक बालेकिल्ले गमावले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसने हे बालेकिल्ले गमावले होते. दरम्यान, आज २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. या निवडणुकीत काँग्रेसने अनेक गमावलेले गड पुन्हा मिळवले आहेत.
२०२४ चे निकाल समोर आले आहेत. देशात पुन्हा एकदा एनडीए आघाडीवर आहे. एनडीएचे सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर येणार आहे. एनडीए २९३ जागांवर आघाडीवर आहे, तर इंडिया आघाडीने २३२ जागांवर आघाडी घेतली आहे. राज्यात महाविकास आघाडी ३० जागांवर आघाडी घेतली आहे, तर महायुती १७ जागांवर आघाडी घेतली आहे.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने नांदेड, धुळे, लातूर, मुंबई उत्तर मध्य, सांगली हे लोकसभा मतदारसंघ गमावले होते. या मतदार संघावर आता काँग्रेसने झेंडा फडकवला आहे.
नांदेड लोकसभा मतदारसंघ
नांदेड लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदार संघावर भाजपाने विजय मिळवला. भाजपाचे प्रतापराव चिखलीकर यांनी या मतदारसंघावर विजय मिळवला. दरम्यान, २०२४ च्या लोकसभेत भाजपाकडून प्रतापराव चिखलीकर तर काँग्रेसकडून वसंतराव चव्हाण मैदानात होते. वसंतराव चव्हाण यांनी ५९ हजार ४१३ आघाडी घेत विजय मिळवला आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघ
धुळे लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसने विजय मिळवला आहे. हा मतदारसंघ २००९ मध्ये काँग्रेसकडे होता, तो पुन्हा भाजपाने घेतला. आता २०२४ मध्ये पुन्हा एकदा काँग्रेसच्या बच्छाव शोभा दिनेश यांनी विजय मिळवला आहे.
लातूर लोकसभा मतदारसंघ
लातूर लोकसभा आधी काँग्रेसचा मतदारसंघ होता. पण २०१४ मध्ये या मतदारसंघावर भाजपाने विजय मिळवला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या डॉ.शिवप्पा कलगे यांनी विजय मिळवला आहे.
मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ
मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ २०१४ च्या काँग्रेसच्या ताब्यात होता. २०१४ मध्ये मोदी लाटेत ही जागा भाजपाने जिंकली. २०१९ मध्ये या जागेवर पुन्हा भाजपाच्या पुनम महाजन यांनी विजय मिळवला. दरम्यान, आता २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी विजय मिळवला आहे.
जालना लोकसभा मतदारसंघ
गेल्या अनेक वर्षापासून जालना लोकसभा मतदारसंघावर भाजपा विजय मिळवत होती. दरम्यान, २०२४ च्या निवडणुकीत ही जागा आता काँग्रेसने भाजपाकडून हिसकावून घेतली आहे. जालना लोकसभेवर काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी विजय मिळवला आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघ
सांगली लोकसभा मतदारसंघ हा माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा मतदारसंघ. २०१४ च्या मोदी लाटेत या मतदारसंघात प्रतिक पाटील यांचा मोठ्या मताधिक्क्याने पराभव झाला. तर २०१९ च्या लोकसभेतही विशाल पाटील यांचा पराभव झाला. दरम्यान, २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी ही निवडणूक अपक्ष लढवली. या निवडणुकीत विशाल पाटील यांनी मोठ्या फरकाने भाजपाच्या संजयकाका पाटील यांचा पराभव केला. अपक्ष निवडणूक लढवल्यानंतर विशाल पाटील यांच्यावर काँग्रेसने अजूनही कोणतीच कारवाई केलेली नाही.