चौथ्या आघाडीसाठी सदाभाऊंचा नकार, तर जानकर-शेट्टी यांच्यात खलबतं 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 03:05 PM2019-03-13T15:05:16+5:302019-03-13T15:06:09+5:30

चौथ्या आघाडीत सामील होण्याबाबत आमची कोणतीही चर्चा झाली नाही, रयत क्रांती संघटनेच्या बैठकीत भाजपसोबतच राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Lok Sabha Elections 2019 - Sadabhau Khot refuse about forth alliance | चौथ्या आघाडीसाठी सदाभाऊंचा नकार, तर जानकर-शेट्टी यांच्यात खलबतं 

चौथ्या आघाडीसाठी सदाभाऊंचा नकार, तर जानकर-शेट्टी यांच्यात खलबतं 

मुंबई - शिवसेना-भाजपा युतीचा निर्णय जाहीर झाला, शिवसेनेने 23 जागा आणि भारतीय जनता पार्टीने 25 जागा लढवणार असल्याची घोषणाही शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी केली. मात्र अद्याप मित्रपक्षांना शिवसेना-भाजपा किती जागा सोडणार याबाबत कोणतीही हालचाल होत नसल्याने घटक पक्षांमध्ये नाराजी व्यक्त केली जातेय. 

काही दिवसांपूर्वी महादेव जानकर यांनी शिवसेना-भाजपला जागावाटपाबाबत सकारात्मक निर्णय घ्या अन्यथा आम्हाला चौथी आघाडी करावी लागेल असा इशारा दिला होता. सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटनादेखील आपल्यासोबत असल्याचा दावा महादेव जानकर यांनी केला मात्र आम्ही चौथ्या आघाडीत जाणार नाही, मुख्यमंत्री घेतील तो निर्णय मान्य असेल असं सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केले 
सदाभाऊ खोत म्हणाले की, चौथ्या आघाडीत सामील होण्याबाबत आमची कोणतीही चर्चा झाली नाही, रयत क्रांती संघटनेच्या बैठकीत भाजपसोबतच राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हातकंणगले मतदारसंघात लोकसभा निवडणूक लढवण्याची आमची इच्छा आहे. मात्र ही जागा शिवसेनेच्या कोट्यातील आहे. शिवसेना हातकंणगले मतदारसंघ सोडण्यास तयार नाही मात्र आम्ही प्रयत्न करत आहोत. अद्याप शिवसेना नेत्यांशी बोलणं झाले नसलं तरी मुख्यमंत्री या जागेबाबत निर्णय घेतील असंही खोत म्हणाले 

दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी स्वाभिमानीला 3 जागा द्या अन्यथा 15 जागांवर उमेदवार उभे करुन स्वबळावर आगामी लोकसभा निवडणूक लढवू असा इशारा दिला. मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत राजू शेट्टी यांनी 13 मार्चपर्यंत निर्णय घ्या असा अल्टीमेटम दिला होता. मात्र अद्याप आघाडीकडून कोणताही प्रस्ताव अथवा चर्चा राजू शेट्टी यांच्याशी करण्यात आली नाही अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे रात्रीपर्यंत हा निर्णय न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यातील 15 जागांवरील लोकसभा उमेदवारांची घोषणा करु शकते. 

दरम्यान महादेव जानकर यांनी मागील लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवली होती. राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात जानकर यांनी प्रचंड प्रमाण मते मिळवली, धनगर समाजाला आरक्षण देऊ या आश्वासनामुळे भाजपला त्यावेळी निवडणुकीत फायदा झाला होता मात्र आता ही परिस्थिती नाही. त्यामुळे महादेव जानकर यांना तिकीट देण्याबाबत भाजपमध्ये एकमत नाही, त्यामुळे जानकर यांनी मंगळवारी पुण्यात राजू शेट्टी यांची भेट घेतली. या भेटीत आगामी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली. या भेटीनंतर सूत्रांकडून असंही सांगण्यात येतंय की, आघाडीबाबत कोणताही निर्णय न झाल्यास जानकर आणि शेट्टी एकत्र येऊन वेगळ्या आघाडीचा निर्णय घेऊ शकतात. 

या जागांवर स्वाभिमानी उमेदवार उभे करण्याची शक्यता
हातकंणगले, कोल्हापूर, सांगली, बुलडाणा, वर्धा, औरंगाबाद, लातूर, परभणी, शिर्डी, नाशिक, माढा, धुळे, नंदूरबार, शिरुर 

खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाला  "बॅट"  निवडणूक चिन्ह
शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाला निवडणूक आयोगाने यंदाच्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीसाठी बॅट हे चिन्ह दिले आहे. स्वाभिमानी पक्ष अमान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्ष आहे. ज्या ज्या ठिकाणी स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार राहतील, त्या ठिकाणी बॅट हे चिन्ह घेऊन स्वाभिमानीचे उमेदवार मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे या  निवडणुकीत राजू शेट्टी कोणत्या प्रकारची बॅटींग करतात, हे पाहणे महत्वाचे आहे
 

Web Title: Lok Sabha Elections 2019 - Sadabhau Khot refuse about forth alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.