आर्थिक संकटात स्टेशनरी वाया घालवू नका, मी...; संजय निरुपमांचा काँग्रेसला खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 07:55 PM2024-04-03T19:55:33+5:302024-04-03T19:56:31+5:30
Lok sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते संजय निरुपम हे पक्षातून बाहेर पडण्याची चिन्हे दिसत आहे. अमोल किर्तीकर यांना मुंबई उत्तर पश्चिममधून उमेदवारी दिल्याने नाराज निरुपम यांनी काँग्रेस नेतृत्वावर टीका केली होती. त्यातून पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई प्रक्रिया सुरू झाली.
मुंबई - Sanjay Nirupam on Congress ( Marathi News ) गेल्या काही दिवसांपासून संजय निरुपम हे काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. त्यात उत्तर पश्चिम मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून अमोल किर्तीकरांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज निरुपमांनी ठाकरेंसह काँग्रेसलाही धारेवर धरलं. त्यात आता निरुपम यांच्यावर हकालपट्टीची कारवाई होणार असं पुढे येताच त्यांनी काँग्रेसला खोचक टोला लगावला आहे.
संजय निरुपम यांनी ट्विट करून म्हटलं की, काँग्रेस पक्षाने माझ्यासाठी ऊर्जा आणि स्टेशनरी वाया घालवू नये. तर उरलेली ऊर्जा आणि स्टेशनरीचा वापर हा पक्ष वाचवण्यासाठी करावा. तसेही पक्ष भीषण आर्थिक संकटातून जात आहे. मी जो एक आठवड्याचा कालावधी दिला होता तो आज पूर्ण झाला आहे. त्यामुळे मी स्वत: उद्या निर्णय घेणार आहे असं त्यांनी म्हटलं आहे.
कॉंग्रेस पार्टी मेरे लिए ज़्यादा ऊर्जा और स्टेशनरी नष्ट ना करे।
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) April 3, 2024
बल्कि अपनी बची-ख़ुची ऊर्जा और स्टेशनरी का इस्तेमाल पार्टी को बचाने के लिए करे।
वैसे भी पार्टी भीषण आर्थिक संकट के दौर से गुजर रही है।
मैंने जो एक हफ़्ते की अवधि दी थी,वह आज पूरी हो गई है।
कल मैं खुद फ़ैसला ले लूँगा।
एका मराठी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात संजय निरुपम यांनी काँग्रेस नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली होती. ज्याप्रमाणे यूपीमध्ये काँग्रेस संपली, तसं मुंबईत काँग्रेस संपेल. आमचे नेते थकले आहेत. पुन्हा कसं उभं राहायचं हा त्यांना प्रश्न आहे. गेल्या ४-५ वर्षात एकाही मुद्द्यांवर काँग्रेस रस्त्यावर उतरली नाही. फक्त ट्विटरवर आंदोलन सुरू आहे. मुद्दे हातात घेत नाहीत. तुम्हाला रस्त्यावर उतरण्यासाठी काम केले पाहिजे पण करत नाही. राज्यात आणि केंद्रात असे नेतृत्व आहे त्यामुळे काँग्रेसची अधोगती सुरू आहे. पुढची रणनीती काय असेल हे मी योग्य वेळी सांगेन असं निरुपम यांनी सांगितले होते.
काय म्हणाले होते नाना पटोले?
महाराष्ट्र काँग्रेसनं स्टार कॅम्पेनरच्या यादीतून संजय निरुपम यांचं नाव हटवलं आहे. त्याशिवाय पक्षशिस्त भंगाची कारवाई करण्याचा प्रस्ताव आम्ही तयार केला आहे. ज्याप्रकारे ते विधान करत आहेत ते पाहता त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं.
#WATCH | Mumbai | On Congress leader Sanjay Nirupam, Maharashtra Congress President Nana Patole says, "His name was mentioned in the star campaigners, which has been cancelled. The kind of statements he has been making, action will be taken..." pic.twitter.com/BqTqBUBvzh
— ANI (@ANI) April 3, 2024
काय आहे वाद?
मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघातून लढण्यासाठी संजय निरुपम प्रयत्नशील होते. ही जागा महाविकास आघाडीत आपल्याकडे घ्यावी अशी मागणी त्यांनी केली. मात्र या जागेवर ठाकरे गटाने अमोल किर्तीकरांना उमेदवारी दिली. त्यानंतर निरुपम यांनी अमोल किर्तीकरांवर खिचडी चोरीचे आरोप केले. काँग्रेस ठाकरे गटापुढे नरमली आहे. त्यामुळे पक्षाचे नुकसान होईल असं संजय निरुपम बोलले. त्यातून हा वाद निर्माण झाला होता.