सातारा गेलीच, नाशिकही नाही, अजित पवार दोनच जागांचे धनी
By दीपक भातुसे | Published: April 20, 2024 05:36 AM2024-04-20T05:36:02+5:302024-04-20T05:36:42+5:30
पाचपैकी दोन जागांवर बाहेरील उमेदवार, एक जागा द्यावी लागली मित्र पक्षाला
दीपक भातुसे, लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महायुतीच्या जागा वाटपात अजित पवार गटाच्या वाट्याला राज्यात केवळ पाच जागा आल्या आहेत. यापैकी दोन जागांवरच अजित पवार गटाचे उमेदवार आहेत. तर उर्वरित तीन जागांपैकी दोन जागांवर मित्र पक्षांचे उमेदवार आयात करून त्यांना उमेदवारी देण्यात आली आणि एक जागा महायुतीला पाठिंबा दिलेल्या मित्र पक्षाला सोडावी लागली. त्यामुळे खऱ्या अर्थाने अजित पवार गटाच्या वाट्याला दोनच जागा आल्याची चर्चा आहे.
२०१९ रोजी राष्ट्रवादीचे चार खासदार निवडून आले होते. यापैकी सुप्रिया सुळे (बारामती), अमोल कोल्हे (शिरूर) आणि श्रीनिवास पाटील (सातारा) हे तीन खासदार शरद पवारांबरोबर राहिले. तर सुनील तटकरे (रायगड) हे अजित पवार गटाबरोबर गेले. जागा वाटपात विद्यमान खासदारांच्या चार जागा कायम राहाव्यात आणि दोन ते तीन जागा अधिकच्या मिळाव्यात, अशी अजित पवार गटाची भूमिका होती.
- बारामती, रायगड, उस्मानाबाद, शिरूर आणि परभणी या पाच जागा अजित पवार गटाच्या वाट्याला आल्या. बारामतीतून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक रिंगणात आहेत. तर रायगडमधून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे निवडणूक लढवत आहेत. हे दोनच मूळ अजित पवार गटाचे उमेदवार आहेत.
- उस्मानाबाद मतदारसंघात भाजपाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना पक्षात प्रवेश देऊन अजित पवार गटाने उमेदवारी दिली. तर शिरूरमध्ये शिंदेसेनेचे आढळराव पाटील यांना पक्षात घेत उमेदवारी दिली.
परभणी मतदारसंघ मित्र पक्षाला सोडावा लागला. तेथून महायुतीचे समर्थक राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर रिंगणात आहेत.
साताऱ्यात राजे नडले.....
भाजपाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यासाठी अजित पवार गटाने सातारा मतदारसंघावर पाणी सोडले. त्या बदल्यात नाशिकची जागा भुजबळ यांच्यासाठी मिळणार असल्याचा दावा केला जात होता. मात्र, शिंदेसेनेने हट्ट कायम ठेवल्याने अखेर नाशिकवरील दावाही सोडावा लागला.
आम्ही चारपेक्षा कमी जागा लढलो असतो तर नुकसान झाले असते. शिंदेसेनेकडे १३ खासदार असूनही त्यांना १३ जागा मिळण्यात अडचण होत आहे. शरद पवारांनीही बाहेरील नेत्यांना पक्षप्रवेश देऊन उमेदवारी दिली आहे. - आनंद परांजपे, प्रवक्ते, अजित पवार गट