लोकसभेत मार पडलाय, आता गाफील राहू नका!; मुख्यमंत्री शिंदे यांचे महायुतीच्या मेळाव्यात आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2024 06:37 AM2024-07-07T06:37:16+5:302024-07-07T06:37:42+5:30
आपले हे सरकार २४ बाय ७ जनतेसाठी, सर्वसामान्यांसाठी काम करणारे सरकार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबई : विरोधकांकडून जनतेमध्ये गैरसमज पसरविण्यात आले. खोटे बोल पण रेटून बोल अशा पद्धतीने प्रचार करण्यात आला. आपण या काळात गाफील राहिलो. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मार पडलाय, मात्र आता गाफील राहून चालणार नाहीत. विरोधक काय खोटा प्रचार करायचा तो करोत, तुम्ही मागील दोन वर्षांत सरकारने केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचवा. लाडकी बहीण, मुलींना उच्चशिक्षण मोफत अशा योजना घराघरांपर्यंत पोहोचवा. महायुती म्हणून एकत्र निवडणुकीला सामारे जायचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना केले.
महायुतीच्या वतीने शनिवारी माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्गदर्शन केले. शिंदे म्हणाले, आधीच्या अडीच वर्षांचे सरकार आणि आपले दोन वर्षांचे सरकार यांची तुलना करायची झाल्यास ते फेसबुक सरकार हाेते. आपले सरकार हे फेस टू फेस सरकार आहे. सर्वसामान्यांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे हे सरकार आहे. या सरकारने शेतकरी, कामगार, महिला या सर्वांसाठी अनेक योजना राबवल्या. या अर्थसंकल्पात योजना जाहीर झाल्यानंतर तर विरोधकांचे चेहरे पांढरेफटक पडले. योजनांचा बॉम्बच त्यांच्यावर पडल्याने ते कावरेबावरे झाले, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. मागच्या निवडणुकीत खोट्या प्रचारामुळे आपण फसलो, पण आपण एकदाच फसलो मात्र वारंवार फसू शकत नाही. आपले हे सरकार २४ बाय ७ जनतेसाठी, सर्वसामान्यांसाठी काम करणारे सरकार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
तडजोड केली तरच युती टिकते - देवेंद्र फडणवीस
महायुती म्हणून आपण विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहोत. निवडणूक म्हटली की प्रत्येक पक्षातील लोकांच्या आशा-अपेक्षा असतात. मात्र महायुती म्हटले तर तडजोड करावी लागते. तडजोड केली तरच युती टिकते, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तिकीटवाटपाचा निर्णय आम्ही तिघे एकत्र चर्चा करून घेऊ. मात्र मी आपल्यापुरते पाहीन असे करून चालणार नाही. आपल्याला एकत्र राहून जिंकण्याचा निर्धार करूनच पुढे जायचे आहे, असे नमूद करताना फडणवीस यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची कविता ऐकवून दाखवत, कदम मिला कर चलना होगा, असे आवाहन केले.
हेच सरकार आणावे लागेल - अजित पवार
आमच्या सरकारने अनेक योजना आणल्या. मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीणसारखी योजनाही आपण आणली. आता या योजना जनतेपर्यंत पोहोचवा. विरोधक निवडणुकीपुरत्या घोषणा आहेत असे म्हणत असले तरी तुम्ही लोकांना सांगा की या योजना चालू ठेवायच्या असतील तर याच सरकारला निवडून आणा. विधानसभा निवडणुकीच्या कामाला सुरुवात करा, मीही केवळ दोन दिवस मंत्रालयात थांबणार असून इतर दिवस महाराष्ट्रभर फिरणार आहे, असे अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.