शिवसेना काेणती, उमेदवार कोण?; निशाणी, पक्षावरून दक्षिण मुंबईत संभ्रम!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 09:53 AM2024-04-23T09:53:18+5:302024-04-23T09:54:46+5:30
आधी मिलिंद देवरा लढणार असे चित्र असताना ते राज्यसभेवर गेले. राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा, यशवंत जाधव यांचाही मतदारांत संपर्क सुरू आहे.
मनोज मोघे
मुंबई : मतदानाला अवघा एक महिना राहिला असला तरी उद्धवसेनेसमोर नेमका कोण उमेदवार उभा राहणार हे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. अरविंद सावंत यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपकडून राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा उभे राहणार? की शिंदेसेनेचा उमेदवार म्हणून यशवंत जाधव उभे राहणार हे चित्रच अद्याप स्पष्ट न झाल्याने शिवसेना कोणती, उमेदवार कोण, निशाणी कोणती? याबाबतीत दक्षिण मुंबईत संभ्रम निर्माण झाला आहे. मतदारांनाच काय वाटते हे जाणून घेतले.
आधी मिलिंद देवरा लढणार असे चित्र असताना ते राज्यसभेवर गेले. राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा, यशवंत जाधव यांचाही मतदारांत संपर्क सुरू आहे. मात्र उमेदवार कोण असणार हे स्पष्ट न झाल्याने मतदार म्हणून आमच्यात मोठ्या प्रमाणात संभ्रम आहे. - विनिता राणे, भायखळा
मुस्लिम मतदार यावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडे झुकलेला आहे. महाविकास आघाडीला मतदान करण्याची मानसिकता ९० टक्के मतदारांत आहे. मात्र अद्यापही समोरचा उमेदवार नेमका कोण आहे हे चित्र स्पष्ट झालेले नाही. जो उमेदवार मतदारांना पोलिंग बूथपर्यंत नेण्यात यशस्वी होईल तो बाजी मारेल - सिद्दीकी शकील अहमद, भेंडीबाजार
मागील दोन निवडणुकांत हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. एक तरुण मतदार म्हणून आतापर्यंत आमचा कल हा धनुष्यबाणाकडेच होता. मात्र आता ही निशाणी बदललेय. मशाल चिन्ह समोर आले असले तरी ओढा धनुष्यबाणाकडे आहे. - अमित गुरव, परळ
अरविंद सावंत कॅडरबेस संघटनेचे उमेदवार आहेत. दुसरीकडे राहुल नार्वेकर हे स्वत: विधानसभा अध्यक्ष असल्याने आपले अधिकार वापरून मतदारांना आश्वासन देत आहेत. इथल्या लोकांमध्ये धनुष्यबाण की मशाल असा विचार नाही. महायुतीचा उमेदवारच ठरला नसल्याने सध्या तरी इथली लढत एकांगी आहे. - उदय बने, कुलाबा