“१०५चा आकडा फेक, मविआत ४-५ जागांवर अजून मतभेद”: नाना पटोले; काँग्रेसची यादी कधी येणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 03:53 PM2024-10-23T15:53:55+5:302024-10-23T15:55:50+5:30
Maharashtra Assembly Election 2024: महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला फेक असल्याचे नाना पटोलेंनी स्पष्ट केल्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आल्याचे सांगितले जात आहे.
Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, राजकीय घडामोडींना मोठा वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेस आणि उद्धवसेनेतील वाद शमल्यानंतर महाविकास आघाडीच्या चर्चेचे गुऱ्हाळ अद्यापही सुरूच आहे. काँग्रेस आणि उद्धवसेनेतील जागा वाटपावर मार्ग काढण्यात येत आहे. ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेस सर्वाधिक १०५ च्या घरात जागा लढणार आहे, त्याखालोखाल उद्धवसेना ९५ च्या घरात आणि शरद पवार गट ८४ च्या घरात जागा लढवणार असून उरलेल्या जागा लहान मित्र पक्षांना सोडण्यात आल्याचे मविआतील सूत्रांनी सांगितले. परंतु, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हे आकडे फेक असल्याचे स्पष्ट केले. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे सांगितले जात आहे.
दोन दिवसांपूर्वी झालेली मविआची बैठक तब्बल ११ तास चालली होती. या बैठकीनंतरही विदर्भ आणि मुंबईतील १५ जागांवरील तिढा या तीन पक्षात कायम होता. विदर्भातील जागांवरून तर काँग्रेस आणि उद्धव सेनेतील वादामुळे आघाडी तुटण्याच्या मार्गावर होती. मात्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आणि उद्धव ठाकरे घेतलेली सामंजस्याची भूमिका आणि शरद पवार यांनी केलेल्या मध्यस्थीमुळे हा वाद शमला आणि थांबलेली मविआची चर्चा पुन्हा सुरू झाली. मंगळवारी सर्व जागा वाटपाची चर्चा संपवायची असा निश्चिय मविआच्या नेत्यांनी केला होता, असे सांगण्यात येत होते. परंतु, नाना पटोले यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर आता पुन्हा एकदा अनेकांच्या भुवया उंचावल्याचे सांगितले जात आहे.
१०५ जागांवर काँग्रेस लढणार असल्याचा आकडा फेक
महाविकास आघाडीतील जागावाटप जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे. अजूनही ४ ते ५ जागांवर मतभेद आहेत. ते लवकरच संपतील. काँग्रेस पक्ष नेमक्या किती जागांवर लढेल, याबाबतचा आकडा उद्या जाहीर करू. आतातरी तसा निश्चित आकडा सांगू शकत नाही. १०५ जागांवर काँग्रेस लढणार असल्याचा आकडा फेक आहे. ठाकरे गटासोबत जागावाटपासंदर्भातील मतभेद जवळपास संपत आला आहे. तसेच महाविकास आघाडीचा जागांचा अंतिम फॉर्म्युला उद्यापर्यंत जाहीर होऊ शकते, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. चंद्रपूर येथील कार्यकर्त्यांनी भेटून त्यांच्या भावना मांडलेल्या आहेत. आम्ही आमच्या बैठकीत त्या मांडू. कालही याबाबत भूमिका मांडली होती. मला वाटते की, यातून मार्ग निघेल, असे नाना पटोले म्हणाले.
दरम्यान, काँग्रेसमधील १०५ उमेदवारांची नावे निश्चित झाली आहेत, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. याबाबतची माहिती नाना पटोले यांनी काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना दिली आहे. तसेच यासंदर्भात राहुल गांधी आणि नाना पटोले यांच्यात फोनवरून चर्चा झाली आहे, असेही समजते. याबाबत टीव्ही९ने वृत्त दिले आहे.