फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 06:14 PM2024-10-23T18:14:41+5:302024-10-23T18:15:56+5:30

Maharashtra Assembly Election 2024: मुंबईतील कुलाबा विधानसभा मतदारसंघातून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना भाजपाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर पक्षातील ज्येष्ठ नेते राज पुरोहित यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता राज पुरोहित यांची नाराजी दूर करून बंड शमवण्यात भाजपाला यश आलं आहे. 

Maharashtra Assembly Election 2024: Devendra Fadnavis' chivalry, Raj Purohit and Rahul Narvekar's reconciliation, BJP's success in quelling Kulabya rebellion  | फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

भाजपाने विधानसभा निवडणुकीसाठी ९९ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक मतदारसंघातून बंडाचे सूर उमटत आहेत. त्यात मुंबईतील कुलाबा विधानसभा मतदारसंघातून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना भाजपाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर पक्षातील ज्येष्ठ नेते राज पुरोहित यांनी नाराजी व्यक्त केली होती. ते ठाकरे गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्याने राहुल नार्वेकर आणि भाजपाची चिंता वाढली होती. मात्र आता राज पुरोहित यांची नाराजी दूर करून बंड शमवण्यात भाजपाला यश आलं आहे. 

राहुल  नार्वेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाराज असलेल्या राज पुरोहित यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यादरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या शिष्टाईमुळे राज पुरोहित आणि राहुल नार्वेकर यांच्यात दिलजमाई झाली. राज पुरोहित यांची नाराजी दूर झाल्यानंतर राहुल नार्वेकर आणि राज पुरोहित यांनी एकत्रपणे प्रसारमाध्यमांना संबोधित करत आपण सोबत असल्याचे संकेत दिले आहेत. तेव्हा प्रसारमाध्यमांशी बोलताना राज पुरोहित यांनी सांगितले की, मी भाजपाचा कार्यकर्ता मुंबईतील ज्येष्ठ नेता आहे. मी काल राम नाईक यांच्यासोबत बोलत होतो. तेव्हा महाराष्ट्र भाजपातील जुने नेते कोण असा प्रश्न चर्चेत आला. तेव्हा काही मोजकीच नावं समोर आली. मी एक स्वयंसेवक आहे. त्या नात्याने देशावर प्रेम करतो. भाजपानं मला खूप काही दिलं आहे. नगरसेवक, आमदार, मंत्री बनवलं. मला चांगली मराठी येत नाही, मुंबई प्रदेशाध्यक्ष बनवलं. खूप काही दिलंय. आता जीवनभर मलाच सगळं मिळत राहील, असं नाही. पक्ष काही दृष्टीकोन ठेवून विचार करतो आणि पक्षाने जो काही निर्णय घेतला असेल तो विचार करून घेतला असेल, असे राज पुरोहित म्हणाले.

त्यांनी सांगितले की, दोन भावांमध्येही कधी कधी मतभेद होतात. कधीकधी सोबत असलेल्या लोकांमुळेही मतभेद होऊ शकतात. मी काल देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांनी मला काही गोष्टी समजावून सांगितल्या. त्यांनी भूपेंद्रजीना फोन करायला सांगितलं. तसेच राहुल नार्वेकर यांनाही माझ्या मनातील काही प्रश्नांवर तोडगा काढण्यास सांगितले. मी भूपेंद्रजींना भेटलो. तेही मनमोकळेपणे भेटले. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही पक्षातील ज्येष्ठ आणि निष्ठावंत नेते आहात. सध्याच्या घडीला तुम्ही पक्षासोबत राहणं आवश्यक आहे. देवेंद्र फडणवीस, भूपेंद्रजी आणि अश्विनीजी यांनी मला जे काही सांगितलं आणि पक्षाने जो काही आदेश दिला त्यानुसार मी राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. आमच्यात चर्चा झाली. त्यानंतर आमच्याती जे काही मतभेद आणि गैरसमज होते ते केवळ पाच मिनिटांत दूर झाले. मागच्या काही दिवसांत अनेकांनी माझ्याशी संपर्क साधला होता. मात्र मी भाजपासोबत आहे, असं स्पष्टपणे सांगितलं, असे राज पुरोहित नाराजी दूर झाल्यानंतर म्हणाले.

तर राहुल नार्वेकर म्हणाले की, राज पुरोहित हे आमचे नेते आहेत. त्यांना योग्य तो मान सन्मान देणं हे कुलाब्यामधील भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे. ते सदैव होत राहील. आम्ही दोघे मिळून कुलाब्याची जागा मोठ्या मताधिक्याने निवडून आणू. भलेही मी उमेदवार असेन, परंतु ही निवडणूक ही भारतीय जनता पक्षाची निवडणूक आहे. राज पुरोहित यांची निवडणूक आहे. आकाश पुरोहित यांची निवडणूक आहे. राहुन नार्वेकर यांची निवडणूक आहे, आम्ही एकत्र येऊन ही जागा किमान ५० हजार मतांनी निवडून आणू, असा विश्वास राज पुरोहित यांच्यासोबत झालेल्या दिलजमाईनंतर राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केला. 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024: Devendra Fadnavis' chivalry, Raj Purohit and Rahul Narvekar's reconciliation, BJP's success in quelling Kulabya rebellion 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.