"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 09:33 PM2024-11-14T21:33:41+5:302024-11-14T21:59:58+5:30
उद्धव ठाकरे हे आजपर्यंत राहुल गांधींकडून बाळासाहेब ठाकरेंचे कौतुक करून घेऊ शकले नाहीत अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली आहे.
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत शेवटची सभा घेतली. यावेळी आपण संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला असून पूर्ण महाराष्ट्राचा आशीर्वाद महायुतीच्या बरोबर असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंचे नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे आजपर्यंत राहुल गांधींकडून बाळासाहेब ठाकरेंचे कौतुक करून घेऊ शकले नाहीत असा टोला पंतप्रधान मोदींनी लगावला.
याआधीच्या सभांमध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे कौतुक करण्याचे धाडस आहे का असा सवाल करत त्यांना आव्हान दिलं होतं. काँग्रेसला आणि त्यांच्या युवराजांनी बाळासाहेब ठाकरेंचे त्यांच्या विचारधारेचे सार्वजनिकरित्या कौतुक करुन दाखवावे, असं आव्हान मोदींनी दिलं होतं. मुंबईतल्या सभेत बोलतानाही पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
"मुंबई ही बाळासाहेब ठाकरेंच्या सिद्धांताचे शहर आहे. मुंबई हे स्वाभिमानाचे शहर आहे. पण महाविकास आघाडीमध्ये एक असा पक्ष आहे ज्यांनी बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात आपला रिमोट कंट्रोल दिला आहे. त्यामुळे मी यांना आव्हान दिलं होतं की काँग्रेसच्या तोंडातून, राहुल गांधींच्या तोंडातून बाळासाहेबांचे कौतुक करणारे काही शब्द बोलून दाखवावे. राहुल गांधींनी तोंडातून एकदा तरी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असं बोलून दाखवावं. एवढं जरी केलं तरी तुम्हाला चांगली झोप लागेल आणि दवाखान्यात जाण्याची गरज लागणार नाही. बाळासाहेबांचे आशीर्वाद मिळतील. आजपर्यंत हे लोक काँग्रेसकडून राहुल गांधींकडून बाळासाहेबांचे कौतुक करून घेऊ शकले नाहीत," असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
"इथले लोक अजूनही विसरलेले नाहीत. एक वेळ होती जेव्हा इथले लोक बस, ट्रेनमधून प्रवास करताना घाबरत होते. आपल्या परिवाराला पुन्हा भेटू की नाही असा लोक विचार करायचे. पण गेल्या काही वर्षात लोकांच्या मनात सुरक्षेची भावना तयार झाली आहे. तेव्हा सरकार वेगळं होतं पण आज मोदी आहे. काँग्रेसचे सरकार होतं तेव्हा देशभरात दहशतवादी घटना होत्या. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बेवारस वस्तूंची भीती दाखवली जायची. आता हे सगळं बंद झालं आहे. दहशतवाद्यांना माहिती आहे की आज देशात मोदीचे सरकार आहे. मुंबई विरोधात काही केलं तर मोदी त्यांना पातळात जाऊनही सोडणार नाही," असा इशारा पंतप्रधान मोदींनी दिला.
"महिलांचा सहभाग ही मुंबईची मोठी ताकद आहे. महाराष्ट्राच्या महिला देशाला दिशा दाखवत आहेत महाराष्ट्रातल्या अनेक स्टार्टअपचे नेतृत्व महिला करत आहेत. महिला मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण करत आहेत. महायुतीच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ मुंबईतल्या अनेक महिलांना मिळाला आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत मिळालेली अनेक घरे सुद्धा महिलांच्या नावावर आहेत. मुंबईकर आपली जबाबदारी पूर्ण ताकदीने निभावतात. त्यामुळे वीस तारखेला मोठ्या प्रमाणात मतदान करण्याची जबाबदारी तुमच्यावर सोपून जात आहे. आपल्याला महायुतीच्या सगळ्या उमेदवारांना मोठ्या फरकाने विजयी करायचे आहे. तुम्हाला मुंबईत महायुतीच्या शपथविधी सोहळ्याची तयारी सुद्धा करायची आहे. मी आज तुम्हाला दहा दिवसांनी बनणाऱ्या महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण द्यायला आलो आहे. झारखंड आणि महाराष्ट्रामध्ये हरियाणापेक्षा जोरदार प्रत्युत्तर महाविकास आघाडीला मिळणार आहे," असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.