मुंबईत ठाकरेच मोठा भाऊ, जास्त जागा देण्याची काँग्रेस-राष्ट्रवादीची तयारी, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 07:29 PM2024-08-24T19:29:41+5:302024-08-24T19:30:56+5:30

मुंबईतल्या जागावाटपाबाबत वांद्रे येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये मविआच्या नेत्यांची बैठक पार पडली. 

Maharashtra assembly Election 2024: Uddhav Thackeray Shiv sena is the elder brother in Mumbai, Congress-NCP are ready to give more seats, but... | मुंबईत ठाकरेच मोठा भाऊ, जास्त जागा देण्याची काँग्रेस-राष्ट्रवादीची तयारी, पण...

मुंबईत ठाकरेच मोठा भाऊ, जास्त जागा देण्याची काँग्रेस-राष्ट्रवादीची तयारी, पण...

मुंबई - मुंबईत ठाकरेंची शिवसेना मोठा भाऊ असेल त्यावर आम्हाला आक्षेप घेण्याचं काही कारण नाही. जे सत्य आहेत ते आहे. जागा किती लढवणार याबाबत काही चर्चाच झाली नाही. जागावाटप झाल्यावर चिठ्ठी तुमच्या हातात देऊ. आजच्या बैठकीत काही राजकीय चर्चा झाली. त्यासोबत बदलापूर आणि इतर भागातील बलात्कार प्रकरणावर चर्चा झाली अशी माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली. 

मुंबईत महाविकास आघाडीची बैठक झाली त्यानंतर ते बोलत होते. यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले की, लोकसभेत शिवसेना ठाकरे गट मोठा भाऊ होता. जर मुंबईबाबत बोलायचे झाले तर शिवसेना मोठा भाऊच राहिल असं त्यांनीस सांगितले. तर सूत्रांच्या हवाल्याने ठाकरे गटाने महाविकास आघाडीच्या बैठकीत मुंबईतील ३६ पैकी २०-२२ जागांवर दावा केल्याची माहिती आहे. अणुशक्तीनगरच्या जागेवर तिन्ही पक्षांनी दावा केला आहे. २०१९ च्या निकालात भाजपानं १६ जागा, शिवसेनेने १४ जागा, काँग्रेसनं ४, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षानं प्रत्येकी एक जागा जिंकली होती. २०२४ च्या जागावाटपात शिवसेना ठाकरे गटाला मुंबईत सर्वाधिक जागा हव्यात कारण लोकसभा निवडणुकीत ठाकरेंचे ३, काँग्रेस १, भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रत्येकी १ खासदार निवडून आलेत. टीव्ही ९ ने ही बातमी दिली.
 
अणुशक्तीनगर मतदारसंघावर मविआच्या तिन्ही पक्षांचा दावा आहे. याठिकाणी विद्यमान राष्ट्रवादी आमदार नवाब मलिक हे अजित पवार गटात आहेत. शरद पवार गटाचे रवींद्र पवार यांच्यासाठी ही जागा राष्ट्रवादीला हवी. तर वांद्रे पूर्व जागेवर शिवसेना ठाकरे गटाने दावा सांगितला आहे. त्याठिकाणी वरूण सरदेसाई हे इच्छुक आहेत. याठिकाणी विद्यमान आमदार झिशान सिद्दीकी हे काँग्रेसचे असून ते पक्षात नाराज आहेत. जर वांद्रे पूर्व जागा आम्हाला सोडली तर चांदिवली विधानसभेची जागा आम्ही काँग्रेसला सोडू असा ठाकरे गटाचा प्रस्ताव आहे. चांदिवली विधानसभेत शिवसेना आमदार दिलीप लांडे आहेत जे शिंदे गटासोबत आहेत. त्याठिकाणी काँग्रेसचे नसीम खान इच्छुक आहेत. 

दरम्यान, बदलापूर प्रकरणानंतर जनतेच्या मनात रोष आहे त्यावर चर्चा झाली. हा राजकीय रोष नसून सामाजिक रोष आहे. राजकीय हेतूनं आंदोलन नाही. जनता रस्त्यावर उतरत आहे त्याचा अर्थ स्पष्ट आहे विद्रोहाची आग लागली आहे. बदलापूर प्रकरणी किती जणांवर गुन्हा नोंदवणार आहे? पुढील आठवड्यात अख्खं बदलापूर हे पोलीस स्टेशनला जाणार, तुम्ही आमच्यावर गुन्हा दाखल करा. तुम्ही लोकांच्या संवेदनाची परीक्षा पाहू नका. माणूस गरीब असू शकतो लाचार नाही. लढवय्या तर कायम असतो. आपल्या इथं मुलींवर बलात्कार होतो. गुन्हा नोंदवला जात नाही. राजकीय हस्तक्षेपामुळे गुन्हा घेतला जात नाही हे सगळं असताना महिला घरी शांत बसतील का? आमच्या मुलाबाळांचे काय होणार याची चिंता महाराष्ट्रातील पालकांना पडली आहे अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केली. 
 

Web Title: Maharashtra assembly Election 2024: Uddhav Thackeray Shiv sena is the elder brother in Mumbai, Congress-NCP are ready to give more seats, but...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.