“महाराष्ट्राची निवडणूक देशाचे भविष्य बदलणारी, मविआचे सरकार आणा”: मल्लिकार्जुन खरगे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 03:38 PM2024-11-10T15:38:54+5:302024-11-10T15:42:54+5:30

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: काँग्रेसच्या योजनांची नक्कल भाजपाने केली आहे, असा दावा करत मल्लिकार्जुन खरगे यांनी महायुती सरकारवर टीकास्त्र सोडले.

maharashtra assembly vidhan sabha election 2024 congress mallikarjun kharge attend maha vikas aghadi manifesto ceremony and appeal to elect govt | “महाराष्ट्राची निवडणूक देशाचे भविष्य बदलणारी, मविआचे सरकार आणा”: मल्लिकार्जुन खरगे

“महाराष्ट्राची निवडणूक देशाचे भविष्य बदलणारी, मविआचे सरकार आणा”: मल्लिकार्जुन खरगे

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्रात सर्व जाती धर्माचे लोक मुंबईकडे आर्थिकदृष्या, रोजगारासाठी, उत्पादन, गुंतवणुकीच्या दृष्टीने अपेक्षेने पहातात. देशभरातून लोक मुंबईत स्वप्न घेऊन येतात व मुंबई त्यांना सामावून घेते, त्यांच्या स्वप्नांचा बळ देते. सामाजिक बदलातही महाराष्ट्र आघाडीवर असतो. महाराष्ट्राची निवडणूक फक्त महाराष्ट्रासाठी नाही तर देशाचे भविष्य बदलणारी निवडणूक आहे. महाराष्ट्राच्या जनतेसाठी शेतकरी, तरुण, महिलांसाठी हे सरकार घालवणे गरजेचे आहे. भाजपा महायुतीचे खोके सरकार सत्तेतून खाली खेचून महाविकास आघाडीचे आणा, असे आवाहन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी केले.

महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रनामा या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. मविआ सत्तेत आल्यानंतर पहिल्या १०० दिवसात काय कामे करणावर व पाच वर्षांत काय काम करणार हे या जाहीरनाम्यात सविस्तर मांडण्यात आले आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना मल्लिकार्जुन खरगे यांनी सदर आवाहन केले. तसेच भाजपा महायुती सरकारवर हल्लाबोल केला.

काँग्रेसच्या योजनेची नक्कल भाजपाने केली

पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचा समाचार घेत मल्लिकार्जून खरगे पुढे म्हणाले की, कर्नाटकात काँग्रेस सरकार महिलांना महालक्ष्मी योजनेतून २ हजारे रुपये देत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याची खिल्ली उडवली आणि आता त्यांचेच सरकार महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेतून १५०० रुपये देत आहेत. काँग्रेसच्या योजनेची नक्कल भाजपाने केली आहे. राहुल गांधी यांनी संविधानाचे लाल रंगाचे पुस्तक दाखवले तर त्याला शहरी नक्षलवाद म्हणून टीका करत आहेत पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लाल रंगाचे संविधान दिल्याचा फोटो दाखवून खरगे यांनी भाजपा व नरेंद्र मोदी यांच्या टीकेतील हवा काढून घेतली.

२०३० पर्यंत समृद्ध महाराष्ट्र बनवण्याचा संकल्प 

या महाराष्ट्रनामामध्ये महिलांना वर्षाला ६ सिलेंडर ५०० रुपयात दिले जातील, महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी शक्ती कायदा आणला जाईल. ३०० युनिट पर्यंत वीजवापर असणा-या ग्राहकांना १०० युनिट मोफत वीज, नवीन औद्योगिक धोरणात रोजगार निर्मितीवर भर असेल. सरकारच्या विविध विभागातील रिक्त २.५ लाख जागा भरल्या जातील. एमपीएससीच्या माध्यमातून नोकर भरती केली जाईल. सरकारी नोकऱ्यातील कंत्राटी भरती पद्धत बंद करणार, सरकारी विभागातील जागांचा अनुषेश भरून काढणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेळापत्रक ठरवून निवडणुका घेतल्या जातील. महाराष्ट्राच्या विकासासाठी कृषी, ग्रामविकास, उद्योग, रोजगार, शहरी विकास, जनकल्याण यावर आधारित आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्रनामा प्रकाशित करत आहोत. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंदू मिलमधील स्मारकाचे काम पूर्ण करू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉरिडॉर बनवला जाईल. शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराचे सरकार स्थापन करु तसेच २०३० पर्यंत समृद्ध महाराष्ट्र बनवण्याचा संकल्प या जाहीरनाम्यातून केला आहे.
 

Web Title: maharashtra assembly vidhan sabha election 2024 congress mallikarjun kharge attend maha vikas aghadi manifesto ceremony and appeal to elect govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.