“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 03:40 PM2024-11-15T15:40:04+5:302024-11-15T15:40:21+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: जनता पंतप्रधान मोदींच्या खोट्या बोलण्यास कंटाळली आहे. त्यामुळे रिकाम्या खुर्च्यांना संबोधित करायची वेळ येत आहे, उलट राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचारसभा, बैठका यांना वेग येत आहे. विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबरला होणार आहे तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यापर्यंत केंद्रातील अनेक नेते राज्यात प्रचाराला येत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर प्रचारसभा झाली. मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांसाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. परंतु, या सभेला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचा दावा करणारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदी, भाजपा आणि महायुतीवर निशाणा साधला. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी पत्रकार परिषदेत बोलताना पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले.
राहुल गांधी यांच्या प्रचार सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे
राहुल गांधी यांनी दलित, आदिवासी, ओबीसी समाजाला सामाजिक न्याय मिळावा यासाठी कन्याकुमारी ते काश्मीर ४ हजार किलोमीटरची पदयात्रा काढली व जातनिहाय जनगणनेची मागणी केली आहे. जातनिहाय जनगणनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या पक्षाची भूमिका काय आहे हे त्यांनी स्पष्ट करावे. जातनिहाय जनगणनेला भाजपाचा विरोध आहे, त्यामुळेच पंतप्रधान मोदी आरक्षण संपवण्याचा खोटा आरोप काँग्रेस पक्षावर करत आहेत. काँग्रेस पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खोट्या आरोपाचा तीव्र निषेधही करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभांना महाराष्ट्रातील जनतेचा प्रतिसाद मिळत नाही. मुंबईतील शिवाजी पार्कवर झालेल्या सभेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. जनता मोदींच्या खोट्या बोलण्यास कंटाळली आहे. नरेंद्र मोदी रिकाम्या खुर्च्यांना संबोधित करत होते. याउलट लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या प्रचार सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, असे सांगत चेन्नीथला यांनी टीका केली.
दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या दि. १६ नोव्हेंबर रोजी चिमूर व धामणगाव रेल्वे येथे जाहीर प्रचार सभा होत आहेत, तर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या उद्या शिर्डी व कोल्हापुरात जाहीर सभा तसेच १७ तारखेला गडचिरोली व नागपूरमध्ये प्रचारसभा होतील, असे रमेश चेन्नीथला यांनी सांगितले आहे.