प्रचाराचा आज ‘मंगळ’वॉर; पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या तीन सभा, राहुल गांधींच्या दाेन सभा!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 06:29 AM2024-11-12T06:29:07+5:302024-11-12T06:30:12+5:30
प्रचार संपण्यासाठी आता अवघे सात दिवस शिल्लक.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता टिपेला पोहोचत असून मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तीन जाहीरसभा तर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या दोन प्रचारसभा मंगळवारी एकाच दिवशी होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दोन सभा मुंबईत होतील. प्रचाराची रणधुमाळी टिपेला पोहोचत असून आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडत आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्या सभा चिमूर, सोलापूर आणि पुणे येथे होतील. राहुल गांधींच्या सभा चिखली (जि. बुलडाणा) आणि गोंदिया येथे होतील. या निमित्ताने एकाच दिवशी हे दोन दिग्गज नेते प्रचाराच्या मैदानात उतरत आहेत. या शिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दोन सभा मुंबईत होतील तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभा अकोला, अमरावती व नागपुरात होत आहेत.
प्रचार संपण्याचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. १८ नोव्हेंबरला प्रचार संपेल. २० नोव्हेंबरला मतदान आहे.
प्रचार संपायला ७ दिवस शिल्लक असताना महायुती आणि महाविकास आघाडीचे दिग्गज नेते, अन्य पक्षांच्या नेत्यांनी वातावरण ढवळून काढले आहे. जाहीरनामे एकमेकांच्या टीकेच्या रडारवर आहेत. शरद पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, अजित पवार, नाना पटोले, ॲड. प्रकाश आंबेडकर आदी नेत्यांच्या दणकेबाज सभांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राष्ट्रीय नेत्यांमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ प्रचाराच्या रणांगणात उतरले आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी गेल्या आठवड्यात प्रचारसभांमधून जातीजातींमध्ये भांडण लावण्याचा खतरनाक खेळ काँग्रेस खेळत असल्याचा घणाघात केला करीत त्यांनी ‘एक है तो सेफ है’ असा नारा दिला. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांची प्रशंसा करायला उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला भाग पाडावे असे आव्हान त्यांनी दिले होते.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नागपूरच्या बहुजन संमेलनात आरक्षणाची ५० टक्के मर्यादेची भिंत आम्ही तोडणारच आणि जात जनगणना होणारच असा निर्धार व्यक्त केला होता. रा.स्व.संघ संविधानावर कधीच थेट आक्रमण करत नाही, ते लपून हल्ले करतात अशी टीकाही त्यांनी केली होती.