Maharashtra Budget Live Updates: देवेंद्र फडणवीसांची महत्वकांक्षी योजना पुन्हा सुरू होणार! ५,००० गावांमध्ये सुरु करणार जलयुक्त शिवार २.०
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 03:32 PM2023-03-09T15:32:07+5:302023-03-09T15:34:10+5:30
शिंदे-फडणवीस सरकारचा अर्थसंकल्प आज सादर झाला.
मुंबई- Maharashtra Budget Live Updates: शिंदे-फडणवीस सरकारचा अर्थसंकल्प आज सादर झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्प सभागृहात सादर केला. अनेक नव्या योजना फडणवीस यांनी जाहीर केल्या. यात महिलांसाठी योजना, अंगणवाडी संविकांच्या मानधनात वाढ केली. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांचा महत्वकांक्षी असलेली योजना जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू केली आहे. यासाठी या वर्षी ५,००० गावांमध्ये ही योजना सुरू करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
जलयुक्त शिवार योजना ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये सरकार सत्तेत आल्यानंतर सुरू केली होती. पुढ २०१९ साली महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर ही योजना बंद करुन चौकशी लावण्यात आली होती. आता पुन्हा एकदा ही योजना सुरू करण्यात आल्याची घोषणा आज अर्थसंकल्प अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
या अर्थसंकल्पात फडणवीस यांनी राज्यातील धनगर समाजालाही मोठं गिफ्ट दिलं आहे. राज्यातील धनगर समाजासाठी 1000 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. (Maharashtra Budget Live Updates)
10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार येणार आहे. महाराष्ट्र मेंढी, शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करण्यात येईल. तसेच, 22 योजनांचे एकत्रिकरण, मंत्रिमंडळ शक्तीप्रदत्त समितीमार्फत अंमलबजावणी केली जाणार आहे. यासाठी अहमदनगर येथे मुख्यालय असणार आहे. याशिवाय, राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेत मेंढीपालनासाठी भरीव निधी दिला जाणार आहे, असे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी, महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास, भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास, रोजगारनिर्मिती: सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा आणि पर्यावरणपूरक विकास या पाच ध्येयांवर राज्याचा अर्थसंकल्प आधारित असून, या अर्थसंकल्पात शिंदे-फडणवीस सरकारकडून अनेक बड्या घोषणा करण्यात आल्या.