Maharashtra Budget Session 2023 : “परीक्षेच्या आधीच बारावीचा गणिताचा पेपर फुटलाच कसा, सरकार काय झोपलंय का?”
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 02:22 PM2023-03-03T14:22:43+5:302023-03-03T14:23:05+5:30
बारावीच्या पेपरफुटी प्रश्नी विरोधी पक्षनेते अजित पवार सरकारवर संतापले
"बारावीचे पेपर सुरु आहेत. बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेडराजा येथे परीक्षेच्या आधीच बारावीचा गणिताचा पेपर फुटलाच कसा... पेपरफुटीचे प्रकार असे वारंवार घडतायच कसे, सरकार काय झोपलंय का?" असा संतप्त सवाल करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पेपरफुटी प्रश्नी सरकारला चांगलेच धारेवर धरले. अभ्यास करणाऱ्या मुलांचे हे नुकसान असून या मागे कोणत रॅकेट कार्यरत आहे का? त्याचा तपास करुन अशा गैरप्रकारांना आळा घालण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली.
"बारावीचे पेपर सुरु आहेत. आज सकाळी साडे दहा वाजताच बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याची बातमी समोर आली. बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा येथे गणिताचा पेपर फुटला. गेल्या काही दिवसात राज्यात पेपरफुटीचे प्रकार वाढले आहेत. अभ्यास करणाऱ्या मुलांवर हा अन्याय आहे. पेपरफुटीच्या मागे कोणते रॅकेट कार्यरत आहे का ? याची सखोल चौकशी केली पाहिजे," असे अजित पवार म्हणाले.
बारावीची परीक्षा देणाऱ्या मुलांचे हे नुकसान आहे. दोषीवर कठोर कारवाई करुन राज्यात सातत्याने सुरु असणारे असे गैरप्रकार थांबले पाहिजेत. त्यासाठी सरकारने ठोस पावले उचलण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.