Maharashtra Budget Session 2023: ' देवेंद्र फडणवीसांनी मला अर्धंच सांगितलंय', शिंदेंनी पुन्हा तो मुद्दा काढला; सभागृहात पिकला हशा!
By मुकेश चव्हाण | Published: March 3, 2023 03:35 PM2023-03-03T15:35:27+5:302023-03-03T15:43:51+5:30
Maharashtra Budget Session 2023: आज अधिवेशनाचा पाचवा दिवस असून एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर आपली भूमिका मांडली.
मुंबई: राष्ट्रवादीचे नेते आणि आत्ताचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी हा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक चर्चेचा मुद्दा ठरला आहे. पहाटेच्या शपथविधीवरून अजित पवार यांना सातत्याने प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. याचदरम्यान आज देखील अर्थसंकल्पीय अधिवेशनात पहाटेच्या शपथविधीवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं.
सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनाचा पाचवा दिवस असून एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर आपली भूमिका मांडली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीचा मुद्दा एकनाथ शिंदे यांनी काढला. देवेंद्र फडणवीस यांनी मला पहाटेच्या शपथविधीबाबत दोन-तीन किस्से सांगितले आहेत, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे म्हणाले की, पहाटेचा शपथविधी म्हणजे मोठा शॉक होता. त्यात घटनेच्या खोलात मी जात नाही. मात्र या शपथविधीच्या काही सुरस कथा आहेत, त्या हळूहळू बाहेर येताय. दोन-चार मला देवेंद्र फडणवीसांनी देखील सांगितल्या. परंतु सगळ्या सांगितल्या नाही. तसेच एकनाथ शिंदे भाषण करताना बाजूला बसलेल्या देवेंद्र फडणवीसांना म्हणाले की, तुम्ही मला अर्धंच सांगितलं आहे, पूर्ण सांगितलेलं नाही. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले इकडे सर्व सांगू नका...देवेंद्र फडणवीसांच्या या विधानावर लगेच अजित पवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस कधीच पूर्ण सांगू शकत नाही. यावर सभागृहात एकच हशा पिकला.
विधानसभा । अर्थसंकल्पीय अधिवेशन । ०३/३/२०२३ https://t.co/XsOn0xWvH4
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) March 3, 2023
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वादग्रस्त ठरलेल्या २०१९ साली घडलेल्या पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच अजित पवार शपथविधीसाठी आले होते, असा खुलासा त्यांनी केला. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. मात्र अजित पवार यांनी याबाबत अजूनही मौन ठेवलं आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"