Maharashtra Budget Session: 'ते' पाहून आम्हालाही मागचे दिवस आठवले; अजितदादांनी काढला भाजपाला चिमटा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 09:47 AM2020-02-25T09:47:51+5:302020-02-25T09:51:41+5:30
Maharashtra Budget Session: भाजपाकडून राज्य सरकारविरोधात आज राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
मुंबई - राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष भाजपाने सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपा आमदारांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. महिला अत्याचार, शेतकरी कर्जमाफी यावरुन भाजपाने राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं.
मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले की,महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचा शुभारंभ झालेला आहे. त्यामुळे भाजपाला आंदोलन करण्याची गरज नाही. दोन-तीन महिन्यात कर्जमाफी प्रक्रिया पूर्ण करण्याचा मानस आहे. विरोधी पक्षात असताना आंदोलन करावं लागतं, आम्हीही विरोधी पक्षात असताना पायऱ्यांवर बसायचो, आंदोलन करायचो, आम्हालाही मागचे दिवस आठवले. पायऱ्यांवर घोषणाबाजी करायचो असं अजितदादांनी सांगितले.
तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वांना सोबत घेऊन जात आहे. सभागृहात काही आयुधे आहेत त्याचा वापर करुन विरोधकांनी प्रश्न उपस्थित करावे, आंदोलन करण्याचा त्यांचा अधिकार आहे. मात्र राज्याच्या हितासाठी महाविकास आघाडी सरकारचं काम करतंय. भाजपाला आंदोलन करण्याची गरज भासणार नाही असं काम करणार आहोत, २-३ महिनेच सरकार येऊन झालेत त्यामुळे आणखी काही दिवस जाऊद्या असा टोला अजित पवारांनी विरोधकांना लगावला.
भाजपाकडून राज्य सरकारविरोधात आज राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना काहीही मदत मिळालेली नाही. ज्या आमच्या कर्जमाफीला नावे ठेवली तीच पद्धत यांनी आत्मसात केली, शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाली आहे. महिला अत्याचार तर पराकोटीला गेला आहे. पोलीस दलाचे खच्चीकरण केल्यामुळे त्यांचे मनोबल घटले आहे आणि त्यामुळे गुन्हेगारीत प्रचंड वाढ झाली आहे असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
तर विश्वासघात करुन सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफीच्या नावाने शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एक रुपया देखील मदत झाली नसताना, महाविकास आघाडीचे हे सरकार कर्जमाफीच्या नावाने शेतकऱ्यांना फसवण्याचं काम करत आहे. त्यामुळे या सरकारविरोधात राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.