Maharashtra CM: अजित पवारांसोबत गेलेले ७ आमदार परतले; शरद पवारांचा दे धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 05:04 PM2019-11-23T17:04:27+5:302019-11-23T17:05:18+5:30
Maharashtra News: अजित पवारांनी या आमदारांना फोन करुन बंगल्यावर येण्याचे आदेश दिले होते. परंतु यातील बहुतांश आमदारांना अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत याची कल्पनादेखील देण्यात आली नव्हती.
मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेच्या नाट्यामध्ये भाजपाने राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार यांना गळाला लावून सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रिपदी अजित पवारांनी शपथ घेतली आहे. अजित पवारांसोबत १०-११ आमदार शपथविधी सोहळ्यात उपस्थित होते. त्यामुळे अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे आमदार फुटल्याची चर्चा सांगण्यात आली.
मात्र शरद पवारांनी अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांशी संवाद साधला. यातील आतापर्यंत ७ आमदार पक्षात पुन्हा परतले आहेत.
यामध्ये दिलीप बनकर, नानासाहेब झिरवळ, माणिकराव कोकाटे, संदीप क्षीरसागर, सुनील भुसारा, डॉ. राजेंद्र शिंगणे आणि सुनील शेळके असे आमदार राष्ट्रवादीसोबत कायम राहिलेले आहेत. अजित पवारांनी या आमदारांना फोन करुन बंगल्यावर येण्याचे आदेश दिले होते. परंतु यातील बहुतांश आमदारांना अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत याची कल्पनादेखील देण्यात आली नव्हती. विधिमंडळ नेत्याचे आदेश आल्याने हे सर्व आमदार अजित पवारांसोबत राजभवनात गेले होते. त्यामुळे अजित पवारांनी आमदारांना फोडण्याची रणनीती बनविल्याची चर्चा आहे.
मी पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात नाही.अजितदादा पवार यांच्या सांगण्यावरुन मी राजभवनावर गेलो होतो. गटनेते असल्याने आदेश पाळला.तिथे क़ाय होणार आहे याबाबत काहीच माहीत नव्हते.पण मी पक्षासोबत आहे. एकदा घेतलेला निर्णय आपण कदापीही बदलनार नाही.!@NCPspeaks@PawarSpeaks@supriya_sule
— Manikrao Shivajirao Kokate (@kokate_manikrao) November 23, 2019
सध्या भाजपाचे संख्याबळ १०५ आमदार आहेत तर अपक्ष आमदारांचा पाठिंबा पकडून भाजपाचं संख्याबळ ११९ वर पोहचलं आहे. मात्र बहुमत गाठण्यासाठी भाजपाला आणखी २२ आमदारांची गरज आहे. त्यामुळे अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांची नेमकी संख्या किती याबाबत स्पष्टता नाही. मात्र जे सदस्य त्यांच्यासोबत गेले होते त्यातील ७ आमदार पुन्हा शरद पवारांच्या पाठिशी उभे राहिले आहेत.
अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी?; शरद पवारांनी दिले संकेत @AjitPawarSpeaks@PawarSpeaks#MaharashtraGovtFormationhttps://t.co/8sCwwyOsG3
— Lokmat (@MiLOKMAT) November 23, 2019
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ सदस्यांची महत्वपूर्ण बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर येथे होत आहे. या बैठकीत अजित पवारांच्या जागी विधिमंडळ नेतेपदी दुसऱ्या कोणत्या नेत्याची नेमणूक केली जाऊ शकते. त्यामुळे अजित पवारांनासोबत घेऊन भाजपाने सत्तेचा दावा केला आहे तो कितपत यशस्वी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे.
'मला आता काहीही बोलायचं नाही, माझ्या सोयीनं भूमिका मांडणार' @AjitPawarSpeaks#Maharashtrahttps://t.co/FsXw5ZHl7K
— Lokmat (@MiLOKMAT) November 23, 2019
दरम्यान, भाजपाला पाठिंबा देण्याबाबत काही निर्णय अजित पवार यांचा आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या धोरणाच्या पूर्णपणे विरोधात आहे. एकाप्रकारे हा शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र अशा प्रकारचा निर्णय आहे असं सांगत शरद पवारांनी अजित पवारांवर कारवाईचे संकेत दिले आहेत. तसेच ज्यांना अंधारात ठेऊन राजभवनावर नेण्यात आलं त्यांच्यावर कारवाई होणार नाही असंही सांगण्यात येत आहे.