Maharashtra CM: अजित पवारांच्या 'घरवापसी'ची शक्यता धुसर; राष्ट्रवादीने विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हटवलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 07:57 PM2019-11-23T19:57:24+5:302019-11-23T20:20:36+5:30
Maharashtra News: महाराष्ट्रात राज्य सरकार बनवण्यासाठी काँग्रेस, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस तिन्ही पक्षांनी एकत्र बसून सरकार बनवण्याची तयारी केली होती.
मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेत भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवारांनी भाजपाला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदाची माळ गळ्यात घालून घेतली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीत अजित पवार यांची विधिमंडळ नेतेपदावरुन हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच विधिमंडळातील सर्व अधिकार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना देण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बैठकीत 50 आमदार उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे. मात्र अद्यापही 4 आमदारांचा संपर्क होत नसल्याचं सांगण्यात येत आहे. आज सकाळी अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांना शपथविधी सोहळ्याला घेऊन गेले होते. मात्र या आमदारांना फसवून राजभवनावर घेऊन गेल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं.
Ajit Pawar removed as NCP legislative party leader. pic.twitter.com/14nVbNvVJc
— ANI (@ANI) November 23, 2019
याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रात राज्य सरकार बनवण्यासाठी काँग्रेस, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस तिन्ही पक्षांनी एकत्र बसून सरकार बनवण्याची तयारी केली होती. आमच्याकडे शिवसेनेचे ५६, राष्ट्रवादीचे ५४ व काँग्रेसचे ४४ अशी १५४ ही आमदारांची संख्या अधिक तिन्ही पक्षांचे सहभागी व पाठिंबा दिलेले आणखी काही अपक्ष सभासद मिळून ही संख्या १६९-७० च्या आसपास जात आहे असं त्यांनी सांगितले.
Top NCP sources: Total 50 MLAs are present in the meeting with NCP Chief Sharad Pawar at YB Chavan Centre in Mumbai. 4 NCP MLAs including Ajit Pawar yet to come for the meeting. They are expected to come for the meeting shortly. All MLAs will be kept at a hotel in Mumbai.
— ANI (@ANI) November 23, 2019
मात्र हा जो काही निर्णय अजित पवार यांचा आहे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या धोरणाच्या पूर्णपणे विरोधात आहे. एकाप्रकारे हा शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र अशा प्रकारचा निर्णय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळाचा सभासद असो किंवा राज्यात काम करणारा कुठलाही कार्यकर्ता असो. जो प्रामाणिक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे तो भाजपासोबत सरकार स्थापन करण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी राहणार नाही याचा विश्वास शरद पवारांनी देत अजित पवारांवर कारवाई करण्याचे संकेत दिले होते.
दरम्यान, आपल्या देशात पक्षांतरबंदी कायदा आहे. या कायद्याच्या तरतुदी बाहेर पडणाऱ्या सदस्यांना लागू होतात. त्यांचं सदस्यत्व जाण्याचा धोका आहे. महाराष्ट्रात जनमत भारतीय जनता पक्षाच्या विरोधी आहे. सर्वसामान्य माणूस त्यांच्या भूमिकेला पाठिंबा देणार नाही. सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि पुन्हा निवडणुका घेतल्या तर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या वतीने त्या व्यक्तीचा पराभव करण्याची काळजी या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून घेतली जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी दिले आहेत.