Maharashtra CM: अजित पवारांच्या सहकार्यामुळे भाजपाने सरकार स्थापन केलं, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 03:56 PM2019-11-26T15:56:13+5:302019-11-26T15:56:44+5:30
Maharashtra News : जे लोक मातोश्रीच्या बाहेर पडत नव्हते ते अनेकांच्या पायऱ्या झिजवत होते.
मुंबई - राज्यातील राजकीय घडामोडीत मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे अवघ्या ४ दिवसात भाजपा सरकार कोसळलं आहे. भाजपाला सर्वात मोठा पक्ष म्हणून जनतेने कौल दिला पण शिवसेनेने साथ सोडली त्यामुळे आमच्याकडे बहुमत नव्हतं. आम्हाला राज्यपालांनी बोलविले सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं पण बहुमत नसल्याने आम्ही दावा केला नाही.
देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले की, जे लोक मातोश्रीच्या बाहेर पडत नव्हते ते अनेकांच्या पायऱ्या झिजवत होते. जनतेच्या मनातलं सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला, शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचा शब्द कधीच दिला नव्हता. शिवसेनेला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं. त्यानंतर राज्यपालांकडे जाऊन आपलं हसं करून घेतलं, सत्तेसाठी सोनिया गांधी यांची लाचारी केली असा टोला शिवसेनेला लगावला.
तसेच राष्ट्रपती राजवट लागल्यानंतरही तीन पक्ष मिळून सरकार तयार करणार असं सांगितले जात होते पण असं होतं नव्हतं. तीन पक्षांची विविध विचारधारा होती. भाजपाला दूर ठेवा एवढाच किमान समान कार्यक्रम होता. राज्यात किती वेळ राष्ट्रपती राजवट राहिल अशी परिस्थिती असताना अजित पवार यांनी सत्तास्थापनेसाठी सहकार्य करण्याचं ठरविले. अजित पवारांशी चर्चा करुन राष्ट्रवादीच्या ५४ आमदारांच्या पाठिंबा पत्राआधारे आम्ही बहुमताचा दावा केला. शपथविधी झाला असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Devendra Fadnavis: We had decided that we will never indulge in horse trading, that we will never try to break away any MLA. Those who said that we indulge in horse trading bought the entire horse stable. #Maharashtrapic.twitter.com/Ys72S9aPTA
— ANI (@ANI) November 26, 2019
दरम्यान, सकाळी अजित पवारांनी माझी भेट घेतली. त्यात त्यांनी आमच्यासोबत येण्यास अडचण आहे असं सांगत राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा आल्याने आमच्याकडेही बहुमत उरलं नाही. आम्ही आमदार फोडणार नाही, घोडेबाजार करणार नाही असं आम्ही सांगितले होतं. अजित पवारांनी राजीनामा दिल्याने कुठलाही घोडेबाजार न करता आम्हीही राजीनामा देणार आहे. जे सत्तास्थापन करणार आहेत त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांनी चांगले सरकार द्यावं, पण हे सरकार आपल्याच ओझ्याखाली दबेल अशी भीती वाटते अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडीवर केली.