Maharashtra CM: गटबाजी टाळण्यासाठी राष्ट्रवादी आमदारांचे ठिकाण बदललं? 'या' दोन हॉटेलमध्ये करणार मुक्काम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 02:15 PM2019-11-25T14:15:26+5:302019-11-25T14:16:26+5:30
Maharashtra News: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या आमदारांना पवईतील हॉटेल रेनिसन्स याठिकाणी एकत्र ठेवण्यात आलं होतं.
मुंबई - देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची घेतलेली शपथ आणि राष्ट्रवादी विधिमंडळ नेते म्हणून अजित पवारांनी केलेली मदत यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठा भूकंप पाहायला मिळाला. शुक्रवारी रात्री भाजपाने महाविकासआघाडीच्या तीन पक्षांवर राजकीय स्ट्राईक करत थेट अजित पवारांना आपल्या बाजूने वळविण्यात यश मिळविलं. त्यामुळे अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे किती आमदार फुटले याची स्पष्टता सध्या कोणालाच नाही.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या आमदारांना पवईतील हॉटेल रेनिसन्स याठिकाणी एकत्र ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीकडून तातडीने सुप्रीम कोर्टात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात याचिका करण्यात आली. मात्र मागील २ दिवस या याचिकांवर सुनावणी झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाने निर्णय राखून ठेवला आहे. मंगळवारी सुप्रीम कोर्ट या प्रकरणावर निर्णय देणार आहे.
दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या आमदारांना रेनिसन्स हॉटेलमधून हलविलं असून या आमदारांची २ गटात विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये १०-१२ आमदारांना हॉटेल सोफिटल, वांद्रे याठिकाणी ठेवण्यात आलं आहे तर उर्वरित आमदारांना सांताक्रुझ येथे ग्रॅँड हयात या हॉटेलला ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत गटबाजी रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणात हालचाली होत असताना दिसत आहे. तर राष्ट्रवादी आमदारांवर शिवसेनेचीही करडी नजर ठेवण्यात आली आहे. तसेच शिवसेना आमदारांनाही ललित हॉटेलमधून द ट्री या हॉटेलला हलविण्यात आलं आहे.
भाजपाकडून ऑपरेशन लोटस राबविण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या आमदारांना कोणत्याही प्रकारे भाजपा नेत्यांकडून संपर्क होऊ नये यासाठी त्यांचे ठिकाण वारंवार बदलण्यात येत आहे. त्याचवेळी दुसरीकडे या तीन पक्षाच्या नेत्यांनी राज्यपालांना भेटून १६२ आमदारांचे संख्याबळ आपल्याकडे असून जर भाजपा बहुमत सिद्ध करण्यास अपयशी ठरलं तर आम्हाला सरकार स्थापन करण्याची संधी देण्यात यावी अशी मागणी केली आहे. राज्यपालांनी भाजपाला ३० नोव्हेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत दिली आहे त्यामुळे विधानसभेच्या सभागृहात काय घडणार याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.