Maharashtra CM:...अन् 'नॉट रिचेबल' धनंजय मुंडे पोहोचले राष्ट्रवादीच्या बैठकीला; अजित पवारांसाठी धक्का?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 05:38 PM2019-11-23T17:38:24+5:302019-11-23T17:41:48+5:30
Maharashtra News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची महत्वपूर्ण बैठक यशवंतराव चव्हाण सेंटरला पार पडत आहे
मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेबाबत सगळ्यात मोठी घडामोड राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. अजित पवारांच्या बंडाला धनंजय मुंडे यांची साथ असल्याचं चित्र होतं. धनंजय मुंडे यांचा कॉलही नॉट रिचेबल लागत असल्याने धनंजय मुंडे हेदेखील अजितदादांसोबत असल्याचं सांगण्यात आलं होतं.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची महत्वपूर्ण बैठक यशवंतराव चव्हाण सेंटरला पार पडत आहे. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली पार पडणाऱ्या या बैठकीत नवीन विधिमंडळ नेत्याची निवड करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. धनंजय मुंडे हे कालपासून कोणत्याही नेत्यांच्या संपर्कात नव्हते. त्यामुळे धनंजय मुंडेबाबत संशयाचं वातावरण पाहायला मिळत होतं. मात्र या बैठकीला धनंजय मुंडे उपस्थित असल्याने सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.
Mumbai: Nationalist Congress Party (NCP) leader Dhananjay Munde arrives at YV Chavan Centre for NCP meeting. pic.twitter.com/7LIDLNJLf7
— ANI (@ANI) November 23, 2019
अजित पवारांसोबत १०-११ आमदार शपथविधी सोहळ्यात उपस्थित होते. त्यामुळे अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे आमदार फुटल्याची चर्चा सांगण्यात आली. मात्र शरद पवारांनी अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांशी संवाद साधला. यातील आतापर्यंत ७ आमदार पक्षात पुन्हा परतले आहेत. यामध्ये दिलीप बनकर, नानासाहेब झिरवळ, माणिकराव कोकाटे, संदीप क्षीरसागर, सुनील भुसारा, डॉ. राजेंद्र शिंगणे आणि सुनील शेळके असे आमदार राष्ट्रवादीसोबत कायम राहिलेले आहेत.
अजित पवारांनी या आमदारांना फोन करुन बंगल्यावर येण्याचे आदेश दिले होते. परंतु यातील बहुतांश आमदारांना अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत याची कल्पनादेखील देण्यात आली नव्हती. विधिमंडळ नेत्याचे आदेश आल्याने हे सर्व आमदार अजित पवारांसोबत राजभवनात गेले होते. त्यामुळे अजित पवारांनी आमदारांना फोडण्याची रणनीती बनविल्याची चर्चा आहे. सध्या भाजपाचे संख्याबळ १०५ आमदार आहेत तर अपक्ष आमदारांचा पाठिंबा पकडून भाजपाचं संख्याबळ ११९ वर पोहचलं आहे. मात्र बहुमत गाठण्यासाठी भाजपाला आणखी २२ आमदारांची गरज आहे. त्यामुळे अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांची नेमकी संख्या किती याबाबत स्पष्टता नाही. मात्र जे सदस्य त्यांच्यासोबत गेले होते त्यातील ७ आमदार पुन्हा शरद पवारांच्या पाठिशी उभे राहिले आहेत.