उद्धव ठाकरे शपथविधीः 'टीम उद्धव'चा 'षटकार'; तीनही पक्षांच्या दोन-दोन 'खास' शिलेदारांकडून मंत्रिपदाची शपथ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 07:12 PM2019-11-28T19:12:24+5:302019-11-28T19:21:06+5:30

Uddhav Thackeray Oath Ceremony: एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, छगन भुजबळ आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली.

Maharashtra CM Oath Ceremony : Eknath Shinde, Subhash Desai, Jayant Patil, Chhagan Bhujbal, Balasaheb Thorat and Nitin Raut take oath as Ministers | उद्धव ठाकरे शपथविधीः 'टीम उद्धव'चा 'षटकार'; तीनही पक्षांच्या दोन-दोन 'खास' शिलेदारांकडून मंत्रिपदाची शपथ

उद्धव ठाकरे शपथविधीः 'टीम उद्धव'चा 'षटकार'; तीनही पक्षांच्या दोन-दोन 'खास' शिलेदारांकडून मंत्रिपदाची शपथ

Next

मुंबई : 'मी उद्धव बाळासाहेब ठाकरे, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की...' असे म्हणत महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. उद्धव ठाकरे आता महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, छगन भुजबळ आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व नितीन राऊत यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह या सर्वांना शपथ दिली.


यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करुन आणि आई वडिलांना स्मरुन मुख्यमंत्रिपदाची शपथ उद्धव ठाकरे यांनी घेतली. तर एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांना स्मरुन शपथ घेतली. त्यानंतर सुभाष देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करुन शपथ घेतली.


याशिवाय, राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शरद पवार यांना वंदन करून शपथ घेतली. यावेळी जयंत पाटील आपल्या वडिलांसोबत आईचेही नाव घेतले. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी जय महाराष्ट्र, जय शिवराय, असे म्हणत महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करून शरद पवारांच्या आदेशानुसार शपथ घेत असल्याचे सांगितले. काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांनी सोनिया गांधी यांच्या आशिर्वादाने शपथ घेतली. त्यानंतर नितीन राऊत यांनी शपथ घेतली. 


उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला विविध राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, राज्यपाल यांच्यासह सेलिब्रिटींनाही हजेरी लावली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कोलकाताच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, डीएमके पक्षाचे नेते एम. के. स्टॅलिन, काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, संजय राऊत, मनोहर जोशी, राज ठाकरे, सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्यासह शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते व राज्यभरातील कार्यकर्ते शिवाजी पार्कवर उपस्थित आहेत.


 

विशेष म्हणजे, या शपथविधी सोहळ्यासाठी राज्यातील ४०० शेतकऱ्यांना विशेष निमंत्रित करण्यात आले. आज दुपारपासून तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांचे दादर स्टेशनवर उतरायला सुरू झाले. स्टेशनवर उतरताच या कार्यकर्त्यांनी घोषणा देण्यास सुरुवात केल्याने स्टेशन परिसर घोषणांनी दुमदुमून गेला होता. तसेच, तीनही पक्षांचे झेंडे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. याशिवाय, 'कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला', 'जय भवानी, जय शिवाजी', 'आवाज कुणाचा, शिवसेनेचा' असा जयघोष करत हजारो शिवसैनिकांनी शिवाजी पार्कवर एकच गर्दी केली आहे.  


दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस 'महाराष्ट्र विकास आघाडी'च्या सरकार स्थापन केले आहे. या सरकारमध्ये शिवसेनेला मुख्यमंत्र्यांसह 11 कॅबिनेट व 5 राज्यमंत्री पदे मिळण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादीला 11 कॅबिनेट व 4 राज्यमंत्री आणि काँग्रेसला 9 कॅबिनेट व 3 राज्यमंत्री पदे मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय, उद्धव ठाकरे सरकारमध्ये मित्रपक्षांना एक कॅबिनेट व एक राज्यमंत्री सुद्धा असणार आहे. 
















Web Title: Maharashtra CM Oath Ceremony : Eknath Shinde, Subhash Desai, Jayant Patil, Chhagan Bhujbal, Balasaheb Thorat and Nitin Raut take oath as Ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.