Maharashtra CM: पवार कुटुंबातील फूट रोखण्यासाठी पडद्यामागे 'या' दोन व्यक्तींनी बजावली महत्त्वाची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 03:08 PM2019-11-26T15:08:36+5:302019-11-26T15:20:25+5:30
सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादीची भूमिका शिवसेनेसोबत जाण्याविषयी स्पष्ट होत नव्हती.
मुंबई - राज्यातील सत्तासंघर्षात अजित पवारांनी केलेल्या बंडामुळे शरद पवारांसह कुटुंबाला मोठा धक्का मानला जात होता. अजित पवारांच्या नाराजीमुळे राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांमध्ये दुफळी पडणार होती. मात्र शरद पवारांनी सूत्रे हातात घेतल्याने बेपत्ता झालेले अनेक आमदार पक्षात परतले. त्यामुळे अजित पवारांची कोंडी निर्माण झाली होती. अशातच पवार कुटुंबाकडून अजित पवारांना वारंवार मनविण्यासाठी प्रयत्न सुरु होते.
अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीत भाजपाची कसोटी लागणार असल्याचं दिसून येत आहे. अजित पवारांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रयत्नशील होते. पण त्यांना यश आले नाही. सुप्रिया सुळे यांनीही अजित पवारांना परत येण्याचे आवाहन केलं होतं. कुटुंबात पडलेल्या फुटीमुळे सुप्रिया सुळे भावूक झाल्या होत्या. त्यांच्या डोळ्यात अश्रूदेखील आले होते.
मात्र अजित पवारांचे बंड थंड होत नसल्याने शरद पवारांनी शेवटचे प्रयत्न करण्यासाठी हालचाली सुरु केल्या. यामध्ये शरद पवारांची पत्नी प्रतिभा पवार आणि सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचं सांगण्यात येत आहे. प्रतिभा पवारांवर अजितदादाचे विशेष प्रेम आहे. सदानंद सुळे यांच्या माध्यमातून प्रतिभा पवार आणि अजित पवारांची भेट झाल्याचं सांगण्यात येतं. सत्तेसाठी कुटुंबात फूट पडू नये यासाठी प्रतिभा पवारांनी प्रयत्न केले. पहिल्यांदाच राजकीय घडामोडीत प्रतिभा पवार यांनी कुटुंब सावरण्यासाठी सहभाग घेतला. प्रतिभा पवार यांच्या शब्दाला अजित पवार विशेष मान देतात. त्यामुळे अजित पवारांनी राजीनामा दिला आहे.
दरम्यान, सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादीची भूमिका शिवसेनेसोबत जाण्याविषयी स्पष्ट होत नव्हती. काँग्रेसलाही राष्ट्रवादीविषयी संदिग्धता होती. मधल्या काळात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत म्हणावा तसा संवाद होत नव्हता. त्यावेळी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी हस्तक्षेप केला होता. त्यामुळे राज्याला दिशा देणारे राजकारण बदलले होते.
पवारांनी नेत्यांच्या मनातली अस्वस्थता ओळखून घेतली होती. ते देखील काय करावे याबद्दल साशंक होते. त्याच काळात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे दोघेही शरद पवार यांना भेटले. त्या भेटीनंतर प्रतिभाकाकींनी शरद पवार यांना एक जुनी आठवण सांगितली. सुप्रिया सुळे जेव्हा पहिल्यांदा निवडणुकीला उभ्या होत्या, तेव्हा भाजपने त्यांच्याविरोधात उमेदवार देण्याची तयारी सुरू केली होती. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी शरद पवार यांना फोन करून आपली मुलगी निवडणूक लढवत आहे, तिच्याविरुद्ध कोणीही उमेदवार देणार नाही, ती बिनविरोध निवडून येईल असे सांगून सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी आपण ठाम उभे असल्याचे सांगितले होते. हा प्रसंग प्रतिभाकाकींनी शरद पवार यांना सांगितला. त्यावेळी बाळासाहेब आपल्या मुलीच्या पाठीशी उभे होते, आज बाळासाहेबांचा मुलगा एकटा पडला आहे, त्याच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे. कोणतेही राजकारण न आणता आपण त्याला मदत केली पाहिजे असा आग्रह प्रतिभाकाकींनी धरला होता. त्यानंतर खऱ्या अर्थानी शरद पवार यांनी पूर्णपणे शिवसेनेला सोबत घेऊन पुढची राजकीय आखणी सुरू केली होती.