Maharashtra CM: राष्ट्रवादीच्या 'गायब' आमदाराला शिवसेना नेत्यांनी शोधलं, हाताला धरून बैठकीला आणलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 07:43 PM2019-11-23T19:43:56+5:302019-11-23T19:49:30+5:30
राष्ट्रवादी आमदारांच्या बैठकीदरम्यान अनेक घटनांनी कल्ला केला. त्यापैकी सगळ्यात नाट्यमय ठरली ती, उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांची एन्ट्री!
मुंबईः महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे हादरे १२ तासांनंतरही कमी झालेले नाहीत. 'रात्रीस खेळ चाले'च्या धक्कादायक प्रयोगानंतर सकाळी-सकाळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि राष्ट्रवादीचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर, भाजपाची रणनीती, शिवसेनेची कोंडी आणि पवार कुटुंबातील फुटीची चर्चा चांद्यापासून बांद्यापर्यंत सुरू आहे. अजितदादांचं बंड टिकणार की राजकीय 'चाणक्य' शरद पवार चातुर्यानं ते मिटवणार?, यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत. अशातच, राष्ट्रवादी आमदारांच्या बैठकीदरम्यान अनेक घटनांनी कल्ला केला. त्यापैकी सगळ्यात नाट्यमय ठरली ती, उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांची एन्ट्री!
मंत्रालयासमोरच असलेल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीचे सर्व नेते, बहुतांश आमदार आणि शेकडो कार्यकर्ते जमले आहेत. तिथे संध्याकाळी सातच्या दरम्यान पांढऱ्या रंगाची एक कार आली. सगळ्यांच्या नजरा, कॅमेरे कारवर खिळले. कारभोवती कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी उसळली. कालपासून 'नॉट रिचेबल' असलेले धनंजय मुंडे तासाभरापूर्वीच या बैठकीला पोहोचले होते. त्यामुळे अजित पवारही परतणार का, याबद्दल प्रचंड उत्सुकता. त्यामुळे तेच कारमध्ये नाहीत ना, हे पाहण्यासाठी धावपळ. परंतु उपस्थितांना आणखी एक धक्का बसतो. कारमधून शिवसेना नेते एकनाथ शिंदे, शशिकांत शिंदे उतरतात. त्याच्यापाठोपाठ मिलिंद नार्वेकर एका व्यक्तीला खांद्याला धरून बाहेर काढतात. त्याला घट्ट पकडून, गर्दीतून वाट काढत हे सगळे नेते यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शिरतात. ही व्यक्ती कोण आणि तिला शिवसेना नेते असं धरून का घेऊन आलेत, हे सुरुवातीला कळत नाही. मात्र, ही व्यक्ती आमदार संजय बनसोडे असल्याचं काही मिनिटांत लक्षात येतं आणि टिपेला पोहोचलेला उत्साह निवळतो.
Mumbai: Shiv Sena leaders Milind Narvekar and Eknath Shinde brought with them 2 NCP MLAs Sanjay Bansod and Babasaheb Patil at YB Chavan Center from the Mumbai airport. The two NCP MLAs are said to be with NCP leader Ajit Pawar. https://t.co/UAzUctBtBf
— ANI (@ANI) November 23, 2019
दरम्यान, संजय बनसोडे हे अजित पवारांसोबत आहेत आणि ते शपथविधीनंतर गायब झालेत, अशी चर्चा सकाळपासून होती. त्यांना मुंबईबाहेर नेलं जाणार असल्याचंही बोललं जात होतं. एकेक आमदार जपण्यासाठी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीनं सर्वस्व पणाला लावलेलं असताना, संजय बनसोडे हे एअरपोर्टजवळच्या सहार हॉटेलमध्ये असल्याची कुणकुण शिवसेनेला लागली. त्यांच्या नेत्यांनी तात्काळ हॉटेल गाठलं आणि तिथून संजय बनसोडे यांना घेऊन ते थेट चव्हाण सेंटरमध्ये पोहोचले. त्यांच्या या 'पकडापकडी'ची सुरस चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दरम्यान, मी कुठेही गेलो नव्हतो. मी शरद पवारांसोबतच आहे, असं संजय बनसोडे यांनी चव्हाण सेंटरमध्ये प्रसारमाध्यमांना सांगितलं.
...अन् राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय बनसोडे यांना शिवसेना नेत्यांनी शोधलं! #MaharashtraPolitics#MaharashtraCM#ShivSena#BJPpic.twitter.com/HB65gN47nN
— Lokmat (@MiLOKMAT) November 23, 2019