Ajit Pawar on Marathi: उद्धवजींची मराठी भाषा गुदगुल्या करुन शालजोडे मारण्याची, अजित पवारांनी केलं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2022 02:39 PM2022-04-02T14:39:57+5:302022-04-02T14:40:54+5:30
मुंबईत मराठी भाषा भवनाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं तोंडभरुन कौतुक केलं.
मुंबई-
मुंबईत मराठी भाषा भवनाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं तोंडभरुन कौतुक केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मराठी भाषा म्हणजे गुदगुल्या करत समोरच्याला शाल जोडे मारण्याची भाषा आहे. त्यांच्या सहवासात राहून आम्हाला त्यांच्या भाषेचा अनुभव घ्यायला मिळतो आहे, असं अजित पवार यावेळी म्हणाले.
मुंबईत आज गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर मराठी भाषा भवनाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर महत्वाचे मंत्री देखील उपस्थित होते. यावेळी मराठी भाषा भवनासाठी आजवर घेण्यात आलेल्या कष्ट आणि अडचणींची माहिती दिली. अनेक अडचणी आणि प्रयत्नांनंतर आज मराठी भाषा भवनाचं भूमिपूजन होत आहे याचं समाधान असल्याचं अजित पवार म्हणाले.
"प्रबोधनकारांचे विचार आणि त्यांची भाषा आम्ही पुस्तकातून वाचली. बाळासाहेबांच्या मराठी टोल्यांचे आम्ही दूर साक्षीदार राहिलो. उद्धवजींची मराठी भाषा आम्ही आता जवळून अनुभवतो आहोत. उद्धवजींची मराठी भाषा फार वेगळी आहे. हळूहळू बोलत असताना ते समोरच्याला गुदगुल्या करतात आणि शालजोडीतनं समोरच्या वस्त्रहरण करणारी त्यांची भाषा आहे. हे त्यांच्या व्यक्तीमत्वाचं मोठं अस्त्र आहे. आदित्य ठाकरेंचही मराठी आम्ही ऐकत आलो आहोत. ते देखील चांगलं मराठी बोलतात आणि महाराष्ट्राला आपलंस करण्याची ताकद निश्चितपणे त्यांच्यात आहे", असं अजित पवार यावेळी म्हणाले.
"मी फक्त ठाकरे कुटुंबाबद्दल बोलत असलो तरी मराठी भाषेचा प्रवास हा महाराष्ट्रातील प्रवास हा येथील प्रत्येक घराचा, त्यांच्या पीढीचा आणि पीढ्यांमधल्या भाषेचा प्रवास आहे. यात थोडाफार फरक होऊ शकतो. परंतु मराठी भाषा ही अशीच एका पीढीपासून पुढच्या पीढीपर्यंत चालत आलेली आहे. यापुढेही ती अशीच प्रवास करत राहणार आहे. मराठी भाषेचा हा प्रवास पाहिला तर कुणी कितीही म्हटलं तरी मराठी भाषा संपणार नाही. नवी पीढी मराठी भाषा अभिमानानं पुढं घेऊन जाईल. मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठंही गेला तरी घरी मराठीच बोलतो. जगाचा अंत झाला तरी कोणत्या ना कोणत्या रुपात मराठी भाषा टीकून राहिल याबद्दल मला खात्री आहे", असंही अजित पवार म्हणाले.