काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर बंडखोरीचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 03:28 AM2019-10-05T03:28:47+5:302019-10-05T03:29:08+5:30
विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी नाराज झालेले इच्छुक उमेदवार अपक्ष किंवा इतर पक्षाचा झेंडा घेऊन मैदानात उतरले आहेत
मुंबई : विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी नाराज झालेले इच्छुक उमेदवार अपक्ष किंवा इतर पक्षाचा झेंडा घेऊन मैदानात उतरले आहेत. चेंबूर, कुर्ला, कलिना मतदारसंघातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांनीही बंडखोरी केली आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसमोर या बंडखोरांचे मोठे आव्हान असणार आहे. कुर्ला मतदारसंघातून काँग्रेसने माजी आमदार चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे युवक काँग्रेसचे अभिषेक मिस्त्री आणि माजी नगरसेवक राजेंद्र माहुलकर नाराज झाले आहेत. माहुलकर यांनी नुकताच वंचित आघाडीमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी शुक्रवारी वंचिततर्फे उमेदवारी दाखल करीत हंडोरे यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत.
कुर्ला मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. या मतदारसंघातील दोन माजी आमदार नवाब मलिक आणि मिलिंद कांबळे यांच्यामध्ये मतभेद आहेत. मलिक यांनी राष्ट्रवादीच्या जोत्स्ना जाधव यांना पाठिंबा दिला आहे. तर कांबळे स्वत: उमेदवारीसाठी आग्रही होते. शनिवारी पक्षाने जाधव यांना उमेदवारी जाहीर केली; पण त्यांच्यासोबत मिलिंद कांबळे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांची समजूत काढण्यासाठी नेत्यांना धावपळ करावी लागणार आहे. कलिना विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने माजी नगरसेवक जॉर्ज अब्राहम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारीसाठी अश्रफ आझमी, ब्रायन मिरांडा, रफिक शेख इच्छुक होते. गेले काही दिवस उमेदवारीबाबत खलबते सुरू होती. गुरुवारी उशिरा अब्राहम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. अब्राहम यांनी अर्ज भरला त्या वेळी अश्रफ आझमी त्यांच्या सोबत होते़