महाराष्ट्र निवडणूक 2019 : शिवसेनेला काँग्रेस- राष्ट्रवादी पाठिंबा देणार?; शरद पवार म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 11:19 AM2019-11-01T11:19:47+5:302019-11-01T11:23:11+5:30
दोन्ही पक्षांमधील मतभेदांचा फायदा घेण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून वेगवेगळे डाव टाकण्यात येत असल्याची देखील चर्चा रंगली होती.
मुंबई: राज्यातल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आठवडा उलटल्यानंतर देखील सत्तास्थापनेसाठी भाजपा आणि शिवसेनेत चढाओढ सुरु आहे. त्यातच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक निवास्थानी जाऊन भेट घेतल्याने शिवसेनेला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र आपल्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसून फक्त दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी गेलो असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्र निवडणूक 2019 : राज्यात सत्तास्थापनेच्या सहा शक्यता; शिगेला पोहोचली उत्सुकता
भाजपा व शिवसेनेला बहुमत मिळाल्यानंतर सत्तास्थानांच्या समान वाटपावरून भाजपा आणि शिवसेनेमध्ये तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही पक्षांमधील मतभेदांचा फायदा घेण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून वेगवेगळे डाव टाकण्यात येत असल्याची देखील चर्चा रंगली होती. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी नेमकी कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेसोबत जाणार नसल्याचे विधान राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत केलं आहे.
संजय राऊत- शरद पवार भेट; शिवसेनेचा भाजपावर दबाव, चर्चेला उधाण
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपाला १०५ जागांवर समाधान मानावे लागले. तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या. शिवसेनेच्या जागा कमी झाल्या असल्या तरी भाजपाला निर्णायक यश न मिळाल्याने शिवसेनेच्या हाती सत्तेच्या चाव्या लागल्या आहेत. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपकडे शिवसेना व्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही. मात्र आधी फार्म्युला नंतर सत्तास्थापना अशी भूमिका शिवसेनेने घेतली असून अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाची मागणी केली आहे. अन्यथा दुसरा पर्याय असल्याचा सूचक इशारा शिवसेनेच्या नेत्यांनी दिला आहे.